अंजनेरी ते मुळेगाव रस्त्यासाठी केंद्राकडून 5 कोटींचा निधी ; खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांनी भक्तांना हनुमान पावला !

इगतपुरीनामा न्यूज, दि. 28 ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )

अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-राजुर बहुला-गौळाणे-विल्होळी रोड ( एम. डी. आर.-१९ ) या रस्त्याचा नुतनीकरणासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-राजुर बहुला-गौळाणे-विल्होळी या रस्त्याच्या दुरुस्तीसह नुतनीकरणासाठी तब्बल ४.८५ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
मंगळवारी हनुमान जयंतीच्याच मंगलदिनी हनुमानाचे जन्मस्थळ असलेल्या अंजनेरीच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाल्याने रहिवाशांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे. या एक योगायोग असल्याची प्रतिक्रिया हनुमान भक्तांची आहे.
खा. गोडसे यांनी गेल्या काही महिन्यांपासून अंजनेरी-मुळेगाव रस्त्याच्या दुरुस्तीसह नुतनीकरणासाठी निथी उपलब्ध व्हावा यासाठी केंद्राकडे प्रयत्न सुरु केले होते. या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल नाशिकसह इतर बाजारपेठांमध्ये वाहतूक करणेकामी सुलभ व्हावे तसेच अंजनेरीच्या गडावर येणाऱ्या भाविकांना थेट गडावर येणे सोपे व्हावे, यासाठी खा. गोडसे यांनी अंजेनरी-मुळेगाव रस्त्यासाठी केंद्राकडे सततचा पाठपुरावा केला होता. खा. गोडसे यांच्या मागणीची गंभीर दखल घेत आज केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री गडकरी यांनी ट्विट करुन नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार विशेष रस्ता कामांसाठी तब्बल १४.१३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव-राजुबहुला रस्त्याचा समावेश असून यासाठी ४.८५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमाल इतरत्र वाहतूक करणेकामी जलद रस्ते उपलब्ध होणार असल्याने या रस्त्यांवरील समस्या सुटण्यास मदत होणार आहे, तसेच या रस्त्याच्या नुतनीकरणामुळे पर्यटन विकासाला अधिकाधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान लवकरच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!