ग्रामसेवक संतोष जाधव, उपसरपंच मंदा बेंडकोळी, ग्रा. पं. सदस्य ईश्वर बेंडकोळी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल : पिंपळगाव मोर येथील पेसा निधीतून ९ लाख ३१ हजाराची केली फसवणूक

इगतपुरीनामा न्यूज – पिंपळगाव मोर येथील तत्कालीन ग्रामसेवक संतोष मिठाराम जाधव, विद्यमान उपसरपंच मंदा गणेश बेंडकोळी आणि ग्रामपंचायत सदस्य ईश्वर उत्तम बेंडकोळी या तिघांवर आज घोटी पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या तिघांनी ग्रामसभा ग्रामकोष अबंध ५ टक्के पैसा निधीमधून ९ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याबद्धल इगतपुरी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर कऱ्हाळे यांनी घोटी पोलिसांत आज फिर्याद दाखल केली. यापूर्वी याप्रकरणी पंचायत समितीमार्फत संपूर्ण चौकशी होऊन ह्या तिघांची नावे निष्पन्न झाल्याने अखेर आज गुन्हा दाखल झाला. १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ ह्या काळात ग्रामसभा ग्रामकोष अबंध ५ टक्के पैसा निधीमधून ९ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आहे. भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४२०, ३४ अन्वये ग्रामपंचायत पिंपळगाव मोर येथील तत्कालीन ग्रामसेवक संतोष मिठाराम जाधव, विद्यमान उपसरपंच तथा ग्रामकोश समिती सदस्य मंदा गणेश बेंडकोळी आणि ग्रामपंचायत सदस्य ईश्वर उत्तम बेंडकोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी याबाबत पुढील तपास सुरु केला आहे. ग्रामपंचायत सदस्या सुमन युवराज गातवे यांनी याप्रकरणी गेल्या वर्षभरापासून पंचायत समितीकडे पाठपुरावा आणि आमरण उपोषण केले होते. संबंधित संशयित आरोपी ग्रामसेवक संतोष मिठाराम जाधव याला यापूर्वी कळवण तालुक्यात रोजगार हमी योजनेत अफरातफरी केल्याने नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाची हवा खावी लागली होती. यासह नांदगाव तालुक्यात २४ लाख एवढ्या मोठ्या रकमेची वसुली त्याच्यावर लावण्यात आलेली आहे. सध्या तो निफाड तालुक्यात कार्यरत असून अशा वादग्रस्त ग्रामसेवकाला जिल्हा परिषद प्रशासन सातत्याने पाठीशी घालत असते. त्यामुळे अपहार आणि फसवणूकीचे प्रकार वारंवार घडत आहेत. प्रशासन यावर कठोर कारवाई कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!