आंतरराज्यीय गुटखा माफियाला इगतपुरीतील २१ लाखांच्या अवैध गुटखा गुन्ह्यात इंदोर मधून अटक : पीआय राजू सुर्वे यांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

इगतपुरीनामा न्यूज – १४ फेब्रुवारीला स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईकडे जाणारा गुटख्याचा कंटेनर पकडून सुमारे २१ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला होता. ह्या बाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गभादवि कलम ३२८, २७२, २७३, १८८, ३४ प्रमाणे दाखल आहे. ह्या गुन्ह्यात आरोपी अमृत भगवान सिंह, रा . वडवेली, पो. हिनौतीया, ता. खिलचीपुर, जि. राजगड, मध्यप्रदेश, पुनमचंद होबा चौहाण, रा. सकारगाव, ता. बिकनगाव, जि. खरगोन, मध्यप्रदेश यांना अटक करण्यात आली होती. यातील अटक आरोपीतांकडे नमुद गुन्ह्याचे तपासात चौकशी केली असता, गुटख्याची साठवणूक करून महाराष्ट्रात तस्करी करणारा मुख्य गुन्हेगार इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुरी, रा. इंदोर याचे नाव निष्पन्न झाले होते. महाराष्ट्र राज्यासह नजीकच्या राज्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी करणारा मुख्य सुत्रधार इसरार मन्सुरी यास अटक करणेकामी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदोर, मध्यप्रदेश येथे रवाना करण्यात आले होते. त्याप्रमाणे पोलीस पथकाने इंदोर शहरातील राऊ परिसरात रात्रभर पाळत ठेवून गुटखा माफिया इसरार मन्सुरी मुस्ताक मन्सुरी, वय ३५, रा. श्रमिक कॉलनी, राऊ, इंदोर, मध्यप्रदेश यास शिताफीने ताब्यात घेतले. ह्या आरोपीला ताब्यात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला १ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ह्या गुन्ह्याचा तपास इगतपुरी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार करीत आहे.  पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील, पोहवा चेतन संवस्तरकर, पोना योगेश कोळी, गिरीष बागुल, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, इगतपुरीच्या पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने, पोहवा योगश भावनाथ, पोकॉ प्रकाश कासार यांच्या पथकाने गुटखा माफीया इसरार मन्सुरी यास अटक केली आहे. आरोपी इसरार मन्सुरी हा इंदोर, मध्यप्रदेश येथे गुटख्याची साठवणूक करून, बंद कंटेनरमध्ये गुटखा लपवून गुटख्याची विविध राज्यांमध्ये चोरटी तस्करी करत होता. हा गुटखा माफिया हा अनेक दिवसांपासून पोलीसांच्या नजरेआड गुटखा तस्करी करत होता. त्यास अटक केल्याने राज्यातील अवैध गुटखा नेटवर्कची पाळे मूळे खोदण्यास पोलीसांना यश येईल असा विश्वास व्यक्त होत आहे.

Similar Posts

error: Content is protected !!