भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
छत्रपती शिवाजी महाराज शूर, बुद्धिमान, मुत्सद्दी, लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते. त्यांचा इतिहास जसा शौर्याचा, धैर्याचा आहे, तसाच औदार्याचादेखील आहे. त्यांनी तलवार चालवली, रणांगण गाजविले, त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब केला. त्यांचे राज्य केवळ एका जातिधर्माचे नव्हते, तर गोरगरीब रयतेचे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे, हिंदूचेच नव्हे, तर सर्व भारतीयांचे, जगभरातील लोकांचे प्रेरणास्थान आहे. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. म्हणून महाराज वंदनीय आहेत. शिवचरित्राने प्रत्येकाच्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार तथा गाथा ज्ञानेश्वरी मुखोद्गत असणारे मनोहर महाराज सायखेडे यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे येथे शिवजयंतीनिमित्त संगीतमय शिवचरित्र कथा सोहळा सुरू आहे. यानिमित्ताने ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. बेलगाव कुऱ्हे ग्रामस्थांनी Live स्वरूपात आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सवानिमित्त शिवचरित्र कथेचा परिसरातील नागरिक लाभ घेत आहेत. ही शिवचरित्रकथा १८ फेब्रुवारी पर्यंत दररोज रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत सुरू आहे. यानिमित्ताने १९ फेब्रुवारीला बेलगाव कुऱ्हे येथे भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिवचरित्रकथेप्रसंगी जिवंत देखावे सादर करण्यात येत असून योगेश महाराज सायखेडे, दिनेश मोजाड, कैलास म्हसणे, पवन भागडे, सागर पोटे, प्रभाकर राक्षे यांच्याकडून कार्यक्रमाला साथसंगत लाभली आहे.
मनोहर महाराज सायखेडे यांनी आपल्या निरुपणात सांगितले की, शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे मोठेपण त्यांच्या समतावादी धोरणात आहे. त्यांनी जातिभेद केला नाही, तसेच स्त्री-पुरुष असा भेदभावदेखील केला नाही. महिलांना नेहमीच आदर, सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे कार्य त्यांनी केले. शिवाजीराजे उपेक्षित, गोरगरीब वर्गाबाबत अत्यंत कनवाळू होते. समाजात मजूर, कष्टकरी, शेतकरी, श्रमकरी आणि विशेषतः सर्व जातिधर्मांतील महिला कायमच उपेक्षित असतात, त्यांच्याबाबत शिवाजी महाराज सहृदयी होते.
शिवचरित्र खऱ्या अर्थाने अभ्यासून ते विविध माध्यमांतून आजच्या पिढीसमोर उभे करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात छत्रपतींचा आदर्श बाळगताना प्रत्येकाने शिवचरित्र हा आपल्या जगण्याचा विषय केल्यास हताश न होता विद्यमान अनेक समस्यांशी आपण समर्थपणे लढू शकतो असे हभप सायखेडे महाराज शेवटी म्हणाले. ह्या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिक लाभ घेत असून कोरोना नियमांचे उचित पालन केले जात आहे. शासन निर्देशानुसार होणाऱ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमामुळे सामाजिक एकोपा वाढीला लागला आहे. ह्या कार्यक्रमासाठी बेलगाव कुऱ्हे येथील युवक, युवती, महिला, आणि सर्व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांना तीन महत्वाचे प्रश्न विचारून जलद उत्तर देणाऱ्या ३ विजेत्यांना बक्षीस दिले जात आहे.