
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द ग्रामपंचायत कार्यालयाने उत्कृष्ट कार्यपद्धती, पारदर्शक प्रशासन आणि नागरिक-केंद्रित सेवा यांचा आदर्श ठेवत आयएसओ 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन मानांकन मिळवले आहे. ग्रामीण भागातील कार्यालयांचे कामकाज अधिक परिणामकारक, शिस्तबद्ध व दर्जेदार व्हावे यासाठी या मानांकनाला विशेष महत्त्व आहे. या मानांकनासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रक्रिया, सेवा, दस्तऐवजीकरण, नागरिक तक्रार निवारण प्रणाली तसेच कार्यालयातील दैनंदिन कामकाजाची काटेकोर पडताळणी प्रमाणित संस्थेमार्फत करण्यात आली. सर्व निकष पूर्ण केल्यामुळे भावली खुर्द ग्रामपंचायतीला हा प्रतिष्ठेचा दर्जा प्राप्त झाल्याचे ग्रामपंचायत अधिकारी रुपाली जाधव यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या या यशामुळे गावातील प्रशासनाची गुणवत्ता आणखी उंचावण्यास मदत होणार असून नागरिकांना वेगवान, पारदर्शक आणि दर्जेदार सेवा मिळण्यास हातभार लागणार आहे. गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक व सर्व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचे ग्रामपंचायतीतर्फे सांगण्यात आले. या यशाबद्धल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, इगतपुरीचे गटविकास अधिकारी महेश वळवी, प्रशासक तथा विस्ताराधिकारी ज्ञानेश्वर कऱ्हाळे, पांडुरंग पाडवी, रवींद्र आहिरे यांनी अभिनंदन केले आहे.