
इगतपुरीनामा न्यूज – अयोध्येत हजारो वर्षानंतर आज प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत. ह्या आनंदोत्सवानिमित्त इगतपुरी तालुक्यातील गावागावात राममय वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावात मागील एका महिन्यापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरु असल्याने रामनामाची महती आणि होणाऱ्या सोहळ्याची पूर्वतयारी करायला मदत झाली. रोषणाई, फुलांची आरास आणि रांगोळ्या काढून सजलेल्या मंदिरांमध्ये आज पहाटेपासून राममय वातावरण निर्माण झाले आहे. पारंपरिक वेशभूषेत महिला आणि पुरुषांनी ह्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा सुवर्णक्षण साठवून ठेवण्यासाठी नियोजन केले आहे. प्रभू श्रीरामाची विविध मंदिरे, हनुमान मंदिरे आणि सर्वच गावांमध्ये राममय भक्तीचा सागर उसळला आहे. घोषणाबाजी करून युवक लक्ष वेधून घेत आहेत. भजन, कीर्तन, प्रवचन, पूजन, महाआरती, महाप्रसाद आणि सामाजिक उपक्रमाद्वारे विविध ठिकाणी रामोत्सव साजरा केला जाणार आहे. इगतपुरी तालुका ह्या सोहळ्यासाठी सजला असून अभूतपूर्व आनंदात नागरिक प्रभू श्रीराम सोहळा दीपोत्सवासारखा साजरा करीत आहेत. घरोघरी सुद्धा उत्साही वातावरणात हा उत्सव साजरा केला जाणार आहे. सर्वतीर्थ टाकेद, सिंहस्थ मुळष्ठान कावनई, घाटनदेवी आदी मंदिरांमध्ये संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.