नाशिक जिल्ह्यात ४० ऑक्सिजन प्लांटद्वारे दिवसाला मिळणार ३७ मेट्रिक टन ऑक्सिजन : पालकमंत्री छगन भुजबळ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ ( जिमाका वृत्तसेवा )

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला 37 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले असल्याचे प्रतिपादन, राज्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे,  वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, नोडल अधिकारी  डॉ. अनंत पवार उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे रुग्णालयाची ऑक्सिजन क्षमता 10 केएलने वाढणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची अंतर्गत ऑक्सिजनची क्षमता 20 केएलची होती.  पंरतु आज निर्माण करण्यात आलेल्या या नव्या प्लांटमुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता 30 केएल झाली आहे. निर्माण करण्यात आलेल्या या प्लांटमुळे  नव्याने वाढविण्यात आलेल्या दीडशे बेडला पूरक व्यवस्था म्हणून या प्लांटचा उपयोग होणार आहे, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प डीपीडीसीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची दिवसाला 225 जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता असणार आहे. तसेच प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात  निर्माण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची क्षमता दिवसाला 125 सिलिंडरची असणार असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये 60 ते 70 जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती प्रतिदिन होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये उद्योग विभागाकडून 70 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करणारा एक मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत कायमस्वरूपी ऑक्सिजनची व्यवस्था होण्यासाठी शासकीय व महापलिका रुग्णालयात 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 24, केंद्र सरकारच्या वतीने 04, एचएएल व इंडिया सिक्युरिटी प्रेस सीएसआर फंडातून 04 प्लांट, नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून 06 तर मालेगाव महानगरपालिकेच्या मध्ये एसडीआरएफ निधीतून 2 असे एकूण 40 ऑक्सिजन जनरेशन प्लांटची निर्मिती केली जाणार आहे. हे सर्व ऑक्सिजन जनरेशन प्लांट जून अखेरपर्यंत कार्यान्वित होणार असल्याचे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

या ठिकाणी होणार ऑक्सिजन जनरेशन प्लांट
जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येवला, मनमाड, कळवण, चांदवड, ग्रामीण रुग्णालय पिंपळगांव बसवंत, इगतपुरी, सिन्नर, अभोणा, वणी, दिंडोरी, बाऱ्हे, घोटी, गिरणारे, हरसूल, निफाड, नगरसूल, लासलगांव, देवळा, उमराणे, सटाणा, नामपूर, मालेगाव सामान्य रुग्णालय आणि महिला रुग्णालय या 24 ठिकाणी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार आहेत. तसेच केंद्र सरकारच्या निधीतून नांदगाव, दाभाडी, पेठ सुरगाणा या 4 ठिकाणी तर प्रेसच्या सीएसआर फंडातून दोडी व त्र्यंबकेश्वर ,गिरणारे, डांगसौंदाणे येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण होणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!