इगतपुरीनामा न्यूज, दि. 24
इगतपुरी शहरात असलेल्या मतिमंद आश्रमशाळेतील 2 विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ माजली आहे राज्यभर मतिमंद शाळांना परवानगी देण्याचे काम अनेक वर्षांपासून बंद असूनही ह्या 2013 पासून सुरु असलेल्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या दोन शाळांना मात्र राज्याच्या समाजकल्याण विभागाने मान्यता कशी दिली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने 2015 मध्ये अनधिकृत असणाऱ्या दोन्ही शाळा तात्काळ बंद करण्याचे २ वेळा आदेश देऊनही जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या आशीर्वादाने शाळा राजरोस सुरु होती. शाळा चालवणारी संस्था परदेशातून या शाळेसाठी कोट्यवधी रुपये देणग्या गोळा करण्याचा करत असल्याचे इगतपुरीत चर्चिले जात असल्याने या प्रकरणी गांभीर्य वाढले आहे. मतिमंद विद्यार्थ्यांच्या मृत्यूने ह्या शाळांची अनागोंदी पुढे आली आहे.
अधिक माहिती अशी की, इगतपुरी शहरात मुंबईच्या एका मंडळाकडून मतिमंद शाळा सुरु आहेत. या शाळेत अनेक निवासी मतिमंद विद्यार्थी शिकत आहेत. राज्यातील मतिमंद शाळांना परवानग्या नसल्या तरी ह्या शाळेला मात्र अनुदान न देता फक्त शासनमान्यता दिल्याचा प्रकार समाजकल्याण खात्याने केलेला आहे. इगतपुरीच्या तत्कालीन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेसह शाळेला आणि जागामालक यांना नोटीस देऊन दोन्ही शाळा बंद करण्याचे आदेश दिले होते. जागामालकांनी तात्काळ त्या संस्थेला त्यांच्या इमारतीतून शाळा बंद करण्याबाबत लेखी कळवले होते. तथापि संस्थेने शाळा बंद न करता उलट जागामालकांना धमकी दिल्याबाबत इगतपुरी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे आतापर्यंत अनेक तक्रार अर्ज दाखल आहेत. संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे परदेशात सुद्धा मोठे संबंध असून या दोन्ही शाळांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या देणग्या जमा करण्यात येतात अशी चर्चा इगतपुरी शहरात सुरु आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली ह्या शाळा करत असूनही जिल्हा परिषदेचे समाजकल्याण विभाग मूग गिळून गप्प का ? अशी चर्चा सुरु आहे.
संबंधित बातमी वाचा https://bit.ly/3QNFroM