
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाट चढून आल्यावर उजव्या बाजूला पुरातन दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रामायण कालीन रामसेतुचा दगड पहावयास मिळतो. अनेक वर्षापूर्वी रामेश्वर वरून आलेल्या एका साधूने येथे एका दिवसासाठी येथे मुक्काम केला होता. येथील मंदिराचे पारंपरिक पुजारी असलेले बैरागी यांचे आजोबा शांताराम चौधरी यांनी त्यांची मनोभावे सेवा केली होती. त्यांनी सेवेने प्रसन्न होऊन हा दगड भेट दिला होता. त्याची पूजा करण्याची आणि निगा राखण्याची जबाबदारी श्री. बैरागी यांना दिली होती. तेंव्हापासून हा रामसेतूचा दगड येथील मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. मात्र हा दगड भक्तांकडून जास्त हाताळला गेल्याने घासला जाऊन झीज झाली आहे. त्यामुळे या पुरातन वारसा लाभलेल्या दगडाची जास्त झीज होऊ नये म्हणून हा दगड एका चौकोनी काचेच्या पाणी भरलेल्या पात्रात ठेवला आहे. आजही हा दगड पाण्यावर तरंगताना दिसत आहे. आजही बैरागी परिवार या प्रसादरुपी लाभलेल्या अनमोल दगडाचे जतन करताना दिसत आहे. साक्षात प्रभू श्रीराम आणि वानरसेनेचा सुवर्णस्पर्श झालेल्या दगडामुळे परमेश्वराची अनुभूती मिळते असे त्यांनी सांगितले.