महाराष्ट्रातील १३ विद्यापीठांच्या नव्या पद्धतीच्या परीक्षांना सामोरे कसे जावे ? ; राज्यातील ७० ते ७५ लाख विद्यार्थ्यांसाठी अनमोल मार्गदर्शन

महाराष्ट्रात १३ विद्यापीठांच्या होणाऱ्या परीक्षा ह्या नव्या पद्धतीने होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ७० ते ७५ लाख विद्यार्थी नव्या पद्धतीने ह्या परीक्षा देणार आहेत. परीक्षा देणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांनी नव्या परीक्षा पद्धतीने होणाऱ्या परीक्षेला कसे सामोरे जावे ? ह्याची परिपूर्ण माहिती देणारा हा मार्गदर्शक लेख आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकाने हा लेख सोशल मीडियावर शेअर करून विद्यार्थ्यांना दिशादर्शक व्हावे अशी अपेक्षा…!

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क – ९८२२४७८४६३

कोरोनाचा परिणाम
सध्या संपूर्ण जगात कोविडचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्याचे परिणाम जसे सर्वच क्षेत्रात पहावयास मिळतात. त्याला आता शिक्षणक्षेत्र देखील अपवाद राहिलेले नाही. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक गोष्टींवर त्याचे परिणाम जाणवत आहेत. परीक्षेच्या पद्धतीवर देखील कोरोनाचे परिणाम दिसून येत आहेत. सर्वच स्पर्धा परीक्षांप्रमाणे विविध विद्यापीठांच्या परीक्षा देखील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या होत आहेत. या परीक्षेच्या बदलत्या स्वरूपामुळे विद्यार्थी गोंधळून गेला आहे. या बदलत्या स्वरूपाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात विनाकारण भीती, दडपण निर्माण झालेले दिसून येते.

जुने स्वरूप
विविध विद्यापीठांच्या परीक्षेत दीर्घ स्वरूपाचे, लघुत्तरी स्वरूपाचे प्रश्न यापूर्वी विचारले जात होते. परंतु कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील तेराही विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या होत आहेत. प्रश्न विचारण्याचे पारंपरिक स्वरूप बदलत आहे. हे बदलणारे स्वरूप विद्यार्थ्यांना खूप नवे वाटत असले तरी त्यात घाबरण्यासारखे मात्र काही नाही. विचारलेल्या प्रश्नाचा आता सर्व बाजूंनी करणे आता आवश्यक झाले आहे.

विद्यार्थ्यांनी भीती काढून टाकावी
परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी झाले आहे. हे स्वरुप खूप सोपे आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्या. मनातील भीती, दडपण काढून टाका. नव्या प्रश्न पद्धतीला सामोरे जाताना आता अभ्यासाची सवय बदलावी लागेल हे लक्षात घ्या.

वस्तुनिष्ठ अभ्यास करा
विद्यार्थ्यांनी जशी परीक्षा तसा अभ्यास करणे आवश्यक आहे. पूर्वीच्या परीक्षा पद्धतीत खूप वाचन आवश्यक होते. कारण प्रश्नाचे उत्तर ३०० शब्दांत, १५० शब्दांत, ५० शब्दांत अशा प्रकारे शब्दसंख्येचे बंधन असल्यामुळे खूप वाचन, जास्त वाचन, भरपूर वाचनाची गरज होती. आता खूप वाचन करण्याची गरज नाही. आता अभ्यास वस्तुनिष्ठ, वाचन वस्तुनिष्ठ करणे महत्वाचे आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्या आणि भरपूर मार्क मिळवा.

वस्तुनिष्ठ अभ्यास कसा करावा ?
या अभ्यासात खूप वाचन, खूप अभ्यास आवश्यक नसतो हे सर्वप्रथम लक्षात घ्या. उदा.१९४४ साली ब्रेटनवुडस् या अमेरिकेतील शहरात भरलेल्या परिषदेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची व विश्व बँकेची स्थापना झाली. हे १४ शब्द वाचल्यानंतर कितीतरी Objective प्रश्न तयार होतात. ते पहा :
०१. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या देशात झाली ? ( अमेरिका )
०२. विश्व बँकेची स्थापना कोणत्या देशात झाली ? ( अमेरिका )
०३.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या परिषदेत झाली ? ( ब्रेटनवुडस् )
०४. विश्व बँकेची स्थापना कोणत्या परिषदेत झाली ? ( ब्रेटनवुडस् )
०५. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? ( १९४४ )
०६. विश्व बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ? ( १९४४ )
०७. जुळ्या भगिनी म्हणून कोणाला संबोधले जाते ? ( विश्व बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी )
०८. IMF चे पूर्ण रूप ओळखा ? ( International Monetary Fund )
०९. IBRD म्हणजेच ……….. होय. ( जागतिक बँक )
१०. IBRD चे पूर्ण रूप ओळखा ? ( International Bank For Reconstruction and Development ) अशाप्रकारे वरील १४ शब्दांवर १० Objective प्रश्न तयार केले. यालाच Objective अभ्यास अथवा वाचन असे म्हणतात.

Objective प्रश्न तयार करा
वाचन करत असताना लहान वही जवळ ठेवा. वर सांगितल्याप्रमाणे Objective प्रश्न तयार करा. प्रश्नांच्या नोंदी वहीत करीत चला. याप्रमाणे अभ्यास केला तर नव्या परीक्षा पध्दतीला आपण सक्षमपणे, चांगल्याप्रकारे आणि न घाबरता, कोणतेही दडपण न बाळगता सामोरे जाऊन चांगले मार्क मिळवू शकतो हे लक्षात ठेवा .

अभ्यासाच्या स्वरूपात बदल
नव्या परीक्षा पध्दतीला सामोरे जाण्यासाठी आपल्या अभ्यास करण्याच्या पध्दतीत आता बदल करणे आवश्यक आहे. पूर्वी एका प्रश्नाची एकच गोष्ट आपण विचारात घेत होतो. आता मात्र त्या प्रश्नाच्या अनेक बाजू लक्षात घेऊन अभ्यास केला पाहिजे. उदा. खालीलपैकी एक साहित्यकृती कुसुमाग्रज यांनी लिहिलेली नाही
०१. स्वेदगंगा ०२. विशाखा ०३. जान्हवी ०४. ययाती आणि देवयानी.
येथे आपल्याला कुसुमाग्रजांनी लिहिलेली ग्रंथसंपदा माहीत असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर विंदा करंदीकरांची ग्रंथ संपदादेखील माहीत असणे आवश्यक आहे. याप्रमाणे एकच गोष्ट माहीत असून चालणार नाही तर अभ्यासक्रमातीत घटकांचा अभ्यास करतांना त्यातील बारीकसारीक तपशिलाबरोबरच त्या घटकाचा सर्वांगीण अभ्यास करणे गरजेचे होय.

स्वतः प्रश्न तयार करा
विद्यापीठांच्या या नव्या परीक्षापद्धतीला सामोरे जाताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे Objective स्वरूपाचे वाचन करणे आवश्यक आहे. विद्यार्थी पुस्तक मिळाल्यानंतर संपूर्ण पुस्तक वाचून संपावितात. तसे न करता पुस्तकाचे वाचन करताना स्वतः Objective प्रश्न तयार करा. त्यासमोर त्याचे उत्तर लिहा. याप्रमाणे अभ्यास केला तर पाठांतराची गरज भासत नाही. कारण प्रश्न आपण स्वतः तयार केलेला असतो. त्यामुळे तर तो चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. उदाहरणार्थ इतिहास विषयाचा विद्यार्थी शिलालेख या अभ्यास घटकाचे वाचन करत असेल तर सर्वच महत्त्वाचे शिलालेख बाजूला काढून Objective प्रश्न किंवा टिपण स्वरुपात माहिती तयार करावी. म्हणजे कोणताही शिलालेख विचारला तरी त्याचे उत्तर देता येईल हे सतत लक्षात ठेवा.

चारही पर्यायांचा परामर्श
नव्या बदलत्या प्रश्न विचारण्याच्या स्वरूपाचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे. ती म्हणजे विचारलेल्या प्रश्नाच्या चारही पर्यायांचा परामर्श घ्या. या पध्दतीने परीक्षेच्या अगोदर काही प्रश्नांची तयारी केली तर अभ्यासघटकांची अतिशय चांगली तयारी होते. उदाहरणार्थ इतिहासाचा हा प्रश्न बघा. प्रश्न – परळचा शिलालेख कोणत्या शालिवाहन शकातील आहे ? . शके ११०९, . शके १०८६, . शके १०७९, . शके ९८२. या प्रश्नाचा योग्य पर्याय हा आहे. विद्यार्थ्यांनी एवढ्यावरच न थांबता इतर पर्यायातील शिलालेख कोणते ते शोधावे. उदा. . शके १०८६ सावरगावचा शिलालेख, . शके १०७९ पळसदेवचा शिलालेख, . शके ९८२ दिवे आगर येथील ताम्रपट.

अभ्यासाची चांगली सवय
वरील पध्दतीने अभ्यास केला तर अभ्यासाची चांगली सवय लागते. शोध घेण्याच्या कौशल्यतंत्राचा विकास होतो. मनातील भीती या प्रकारच्या अभ्यासाने दूर होते. आत्मविश्वास वाढतो. बारीक अभ्यास करण्याची सवय लागते. स्वतःचे अभ्यास साहित्य विकसित करता येते. तयार अभ्यास साहित्यावर अवलंबून न राहता स्वतःचे तयार केलेले साहित्य विश्वासार्ह असे होते. प्रश्न कोणत्याही पध्दतीने विचारला तरी योग्य उत्तर देता येते. थोडक्यात अभ्यासाच्या या चांगल्या सवयीमुळे विद्यापीठांच्या नव्या Objective पध्दतीच्या परीक्षेला अतिशय सक्षम आणि चांगल्या प्रकारे आपण सामोरे जाऊन सुयश संपादन करु शकतो हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )

Similar Posts

8 Comments

  1. avatar
    प्रा. रोमा विष्णुसिंग परदेशी says:

    अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे.

  2. avatar
    विलास जोपळे says:

    वस्तुनिष्ठ प्रश्न ..कसे असतात हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना चांगले पटवून दिले आहे. आणि स्पर्धा परीक्षा मध्ये अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची तयारी योग्य पद्धतीने करताना. कोणती काळजी घ्यावी कशावर लक्ष केंद्रित करावे..हे योग्य व उदाहरणातून पटवून सांगितले …धन्यवाद..

  3. avatar
    Titiksha Shelar says:

    अतिशय उपयुक्त दिशादर्शक मार्गदर्शनासाठी खूप धन्यवाद सर🙏

Leave a Reply

error: Content is protected !!