
प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज : पाडळी देशमुख, ता. इगतपुरी येथे गेल्या अडीच माहिन्यांपासून ग्रामसेवक कोण आहे हा प्रश्न दस्तुरखुद्द लोकनियुक्त सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच आणि सर्व सदस्यांना पडला आहे. महामार्गाजवळ असणाऱ्या पाडळी देशमुख गावची अशी अवस्था असेल तर दुर्गम भागातील गावांची काय अवस्था असणार असा प्रश्न पडला असुन याप्रकरणी उपोषण करणार असल्याचा इशारा लोकनियुक्त सरपंच खंडेराव धांडे यांनी दिला आहे. आधीचे ग्रामसेवक संदीप निरभवणे यांच्याकडे तीन गावांचा कार्यभार असल्याने अडीच महिन्यांपूर्वी नवीनच ग्रामसेवक पाडळी देशमुख गावाला दिले असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे नवीन ग्रामसेवक फक्त दोनच हजर झाले. त्यानंतर त्यांनी मी प्रमोशनवर असल्याचे कारण देत ते पुन्हा आलेच नाही. ग्रामसेवक संदीप निरभवणे यांनीच श्री. रनर ग्रामसेवक आले असल्याचे सांगितले खरे पण कागदोपत्री निरभवणे यांनी कुठलाही चार्ज दिला नसल्याने नवीन ग्रामसेवक आलेच कसे..? असा प्रश्न आहे. यामुळे अडीच महिन्यांपासून ग्रामपंचायतीचा कारभार ठप्पच आहे. असे असले तरी गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकनियुक्त सरपंच खंडेराव धांडे हे धडपड करीत आहेत. मात्र ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक हे ग्रामपंचायतच्या रथाचे दोन चाके आहेत मात्र ग्रामसेवक नसल्याने सरपंचाचाही नाईलाज झाला आहे. इगतपुरी पंचायत समितीला याप्रश्नाचे गांभीर्य नसून हायवे लगतच्या गावावर अशी वेळ यावी हे दुर्दैव आहे. पंचायत समितीकडुन तात्काळ ग्रामसेवक नियुक्त न झाल्यास ग्रामस्थांसमवेत १ जानेवारीला उपोषण करणार असल्याचा इशारा पाडळी देशमुखचे लोकनियुक्त सरपंच खंडेराव धांडे यांनी दिला आहे.
महामार्गालगत असणाऱ्या पाडळी देशमुख गावात सरपंच या नात्याने मी सतत कार्यरत आहे. मात्र ग्रामपंचायतीला ग्रामसेवक आहे की नाही हा प्रश्न मी स्वतः सरपंच असतांना मला पडला आहे. त्यातच इगतपुरी पंचायत समितीचेही याकडे दुर्लक्ष असुन पंचायत समितीने तात्काळ ग्रामसेवक नियुक्त करावा. अन्यथा १ जानेवारीला इगतपुरी पंचायत समिती समोर उपोषण करणार आहे.
- खंडेराव धांडे
लोकनियुक्त सरपंच, पाडळी देशमुख