कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
पाचटाच्या झापाला,
घर म्हणत राहिलो !
तुरट्याच्या कुडाला,
भीत म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
पत्र्याच्या आडवना,
दार म्हणत राहिलो !
मातीच्या लोटक्याला,
तवली म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
चार फणी औताला,
पांभर म्हणणे शिकलो !
तीन फणी तिफनीला
चिरखड म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
बाटलीच्या बुचनाला,
वात लावीत बसलो !
केरोसीनच्या दिव्याला,
चिमणी म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
चारपायीच्या खांबाला,
माचा म्हणणे शिकलो !
बाज विणेल सुताला,
सुम म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
बाजरी पेंढ्या ढिगांना,
सुडी म्हणणे शिकलो !
चाऱ्याच्या ढिगाला,
वळई म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
धान्याच्या ढिगाला,
रास म्हणणे शिकलो !
गोवऱ्यांच्या ढिगाला,
करड म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
कास्याच्या ताटाला,
थाळा म्हणणे शिकलो !
पितळाच्या परातीला,
ताम्हण म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
सुताच्या चराटाला,
सैंदर म्हणणे शिकलो !
मोट ओढण्या दोराला,
नाडा म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
मांजरपाट कोपरीला,
कफनी म्हणणे शिकलो !
पायाच्या वाहनांना,
पायतन म्हणत गेलो !!
बरं झालं शेतकऱ्या,
पोटी जन्मा आलो !!
( कवी जी. पी. खैरनार हे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक आहेत. )