
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटातून ट्रेलरला इगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात १५ हजाराची लाच मागितल्याप्रकरणी घोटीच्या महामार्ग पोलीस केंद्रातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. कैलास रामदास गोरे व संतोष उत्तम माळोदे असे दोघा संशयित पोलिसांची नावे आहेत. तक्रारदार यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांचा ट्रेलर मुंबईकडून इगतपुरीच्या दिशेने जात होता. ट्रेलर यास कसारा येथील घाटातून इगतपुरीकडे विरुध्द दिशेने जाण्याची मुभा देत घाट ओलांडून पार करुन देण्याच्या मोबदल्यात पोलीस नाईक कैलास गोरे यांनी पंचांसमक्ष २० हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर घाट पार करुन महामार्ग पोलीस केंद्र, घोटी ता. इगतपुरी येथे आल्यावर पोलीस शिपाई संतोष उत्तम माळोदे यांनी तडजोडीअंती १५ हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. त्यानुसार या दोघांविरुध्द इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.