कष्टकरी, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला आणि वंचित घटक अनेक वर्षांपासून विविध समस्यांशी झुंजत आहे. या गहन समस्यांवर परिणामकारक उत्तरं शोधण्यासाठी नाशिक जिल्ह्यात भगवान मधे हा युवक खऱ्या अर्थाने लढतोय. स्वातंत्र्याचा दुसरा लढा पुकारून वंचित समाजाला लोकशाहीची मधुर फळे आणि समस्यापासून कायमची मुक्ती देण्यासाठी त्यांनी एल्गार कष्टकरी संघटना उभी केली. संघटनेला एक वर्ष पूर्ण होत असतांना मागे वळून पाहिले तर जागरूक नागरिक उभे करून संघटनेने अनेकविध प्रश्न सोडवल्याचे दिसून येईल. भगवान मधे यांच्यामध्ये भारताचे संविधान आणि लोकशाही ठासून भरलेली असल्याने कायदेशीर मार्गाने प्रशासनाला वठणीवर आणायला मदत झाली. एवढेच नाही तर नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांच्या जोरावर “एल्गार” पुकारणारे अनेक कार्यकर्ते सुद्धा निर्माण झाले आहेत. दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासींचे आरोग्याचे प्रश्न, रस्त्याच्या समस्या, शिक्षणाच्या सुविधा, कुपोषण मुक्ती, भ्रष्ट्राचार मुक्ती, सक्षम ग्रामपंचायती, सक्षम लोकप्रतिनिधी, महिलांचे प्रश्न आदी विषयांवर एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी जाज्वल्य संघर्ष केला. अल्प काळातच त्यांच्या संघर्षाला उत्तम यश लाभलेले आहे. स्वातंत्र्याचा दुसरा लढा अद्याप जिंकायचा बाकी असून त्यांनी पुकारलेला “एल्गार” यापुढेही सुरुच राहणार आहे. कष्टकरी, शोषित, पीडित, शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला आणि वंचित घटक आदी घटकांचे प्रतिनिधी म्हणून भगवान मधे मशाल हाती घेऊन आदिवासी कष्टकरी भूमीहीन यांच्या न्याय हक्कासाठी रणांगणात सुसज्ज होऊन उभे आहेत. एल्गार कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून भगवान मधे यांचा एक वर्षाचा यशस्वी प्रवास न संपणारा असून यापुढेही निरंतर सुरूच राहणार आहे. “आपणच सरकार आपणच क्रांतिकारक” ह्या ज्वलंत विचारातून अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्याचा दुसरा लढा जिंकून “सक्षम नागरिक सक्षम लोकशाही” भक्कम करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
दारिद्र्याने पोखरलेल्या, आजाराने ग्रासलेल्या आणि अज्ञानाने पिचलेल्या लोकांसाठी भगवान मधे यांच्या एल्गार कष्टकरी संघटनेने एक वर्षात अनेक आंदोलने केली. त्याद्वारे या सर्वांना न्याय मिळवून देण्याचे काम संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निस्वार्थीपणाने केले. आजही उपेक्षित समाजाला रस्त्यावरून येऊन संघर्ष करावा लागतो. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या नंतरही ह्या देशाच्या मूळ मालकापर्यंत त्यांच्या हक्काचे संविधान आणि स्वातंत्र्याने दिलेले मूलभूत अधिकार व हक्क पोहोचलेले नाहीत. जोपर्यंत स्वातंत्र्याने दिलेले मूलभूत अधिकार आणि हक्क कष्टकरी, गरीब आदिवासी यांना सन्मानपूर्वक मिळत नाही तोपर्यंत एल्गार संघटनेचा लढा निरंतर सुरू राहील. याचसाठी भगवान मधे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली क्रांतिकारकांनी पाहिलेले सुंदर स्वप्न पूर्ण करण्याचं काम एल्गार संघटनेचे कार्यकर्ते करीत आहेत. एल्गारने वर्षभरात अनेक आंदोलने करून अनेक लढाया जिंकल्या. हक्काचे रेशन कार्ड, जातीचे दाखले, घरकुल, वीज रस्ते अशा अनेक सुविधा मिळवून दिल्याने हजारो लोकांनी संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. दिवस उजाडल्यावर तहान भूक विसरून आपलं सर्व आयुष्य दुसऱ्याचं जगणं सुसह्य आणि आनंददायी करून कारणी लावण्यासाठी भगवान मधे झपाटलेले आहेत. अनेक प्रश्नांच्या मुळाशी जाऊन काम करणारे भगवान मधे यांनी कष्टकरी नागरिकांचे आयुष्य मनापासून स्वीकारलेले आहे. पत्नी सुरेखा आणि कुटुंबासोबत मातीच्या झोपडीत राहतांना वंचित नागरिकांसाठी भगवान मधे प्रेरक ठरतात. कड्या कुलूप नसलेल्या याच झोपडीत येणाऱ्या कुणाही व्यक्तीसाठी त्यांच्या घराची दारं नेहमी मोकळी असतात. वंचितांच्या शाश्वत विकासासाठी सकारात्मक ऊर्जेने समृद्ध आणि कृतिशील आयुष्य अर्पण करण्यासाठी भगवान मधे आणि त्यांची एल्गार कष्टकरी संघटना बेभान होऊन काम करतेय. या संघटनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा..