
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे पती पत्नीच्या किरकोळ वादातून पतीने लोखंडे पहार डोक्यात मारून पत्नीची हत्या केली. याबाबत वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी १२ तासाच्या आत आरोपीला शिताफीने अटक केली. घोटी खुर्द येथे मंगळवारी २१ नोव्हेंबरला मध्यरात्री मुकुंदा हरी वाघ व त्याची पत्नी सुमित्रा मुकुंदा वाघ वय ३८ यांचा दारू पिण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून दारूच्या नशेतील मुकुंदाने रागाच्या भरात लोखंडी पहारीने पत्नी सुमित्राच्या डोक्यात जोरदार प्रहार करत तिचा खून केला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली बघून पती मुकुंदा हरि वाघ याने तिथून पळ काढला. पोलीस पाटील यांच्या खबरीवरून वाडीवऱ्हे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा आढावा घेतला. तपासाची चक्र वेगाने फिरवत संशयित आरोपी मुकुंदा हरि वाघ वय ४५ यास १२ तासाच्या आत घोटी खुर्द जवळील गावमाथा येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक केली. वाडीवऱ्हेचे पोलीस निरिक्षक समीर बारवकर, उपनिरीक्षक राज पाटील, प्रवीण काकड, हवा. येशी, धारणकर, पवार, तुपलोंढे, विक्रम काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली.