

इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे मंगळवारी २१ नोव्हेंबरला इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे आणि कुशेगाव येथील विकासकामांची पाहणी करण्यासाठी भेट देणार आहेत. इगतपुरी तालुक्यासाठी राज्यपाल यांचा दौरा महत्वपूर्ण असून ही बाब तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने चोख व्यवस्थापन केले असून हेलिकॉप्टर उतरण्यासाठी मोडाळे येथे हेलिपॅड बनवण्यात येणार आहे. सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून नियोजन करावे. यासोबतच आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेळेत सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने नियोजित हेलिपॅड, शासकीय विश्रामगृह, व दौरा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली जाणार असून वाहतुक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करण्यात येणार आहे. सुरक्षा व इतर बाबींच्या व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन सुरु केले आहे. राज्यपाल महोदय इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव ह्या अतिदुर्गम भागातील शाश्वत विकासकामाची पाहणी करून आढावा घेणार आहेत.