मोडाळे, शिरसाठे, कुशेगाव येथील विकास कामांचे भूमिपूजन व उदघाटन सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. आमचा इतर समाजाला दिलेल्या आरक्षणातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. तुम्ही महाराष्ट्र सात बाऱ्यावर घेतला काय ? अरे त्यांना गावात येऊ द्या बोलू द्या, पटले तर ठीक नाहीतर सोडून द्या, आणि अरे कोण म्हणते भुजबळांना पाडेल, अरे पण भुजबळ किती जणांना पाडेल हे तुम्हाला माहित नाही. त्यामुळे भ्रमात राहू नका दादागिरी करणे हे धंदे सोडून द्या, ओबीसीसाठी ३५ वर्ष मी लढलो आणि यापुढे ही लढणार आहे. त्यामुळे कोणीही अन्याय केला तर सहन करणार नाही असा घणाघात अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी केला. ते इगतपुरी तालुक्यातील मोडाळे, शिरसाठे व कुशेगाव येथे विविध विकासकामांचे उदघाट्न करण्यात आले त्यावेळी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांना जपणारे शाहू महाराज बघा आणि तुम्ही काय करता असा टोला यावेळी त्यांनी दिला. ते म्हणाले की मला आमदार, मंत्री याची अपेक्षा नाही, मी काम करेल ते गरिबांसाठीच करेल. माझ्याकडे आजपर्यंत कुठल्याही जातीचा माणूस आला तर मी कधी त्याला जात विचारली नाही. आणि मला ही कधी कोणी जात विचारली नाही. मराठा समाजाला आरक्षण द्या मात्र ते ओबीसी कोट्यातून देऊ नका. कारण आधीच तुटपुंजे आरक्षण असून त्याचे अजून तुकडे होतील. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण वेगळे व कायद्याप्रमाणे द्या जेणेकरून ते कायम टिकले पाहिजे. लोकांना सत्य परिस्थिती दाखवली पाहिजे. आज मी ३७४ जातींचा प्रतिनिधित्व करत असून फक्त वंजारी, माळी धनगर यांचे मी नेतृत्व करत नाही. तर सर्व ओबीसीच नेतृत्व मी करत आहे. मराठा समाजात देखील काही समजदार लोक आहेत की आम्हाला कुणबी नको, आम्हाला मराठा पाहिजे असे पण लोक पण आहेत.

व्यासपिठावर माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार शिवराम झोले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, शिवा काळे, प्रशांत कडु, देवराम मराडे, नारायण वळकंदे, शाम परदेशी, डॉ. जगताप, कैलास भगत, अशोक शिंदे, भगवान मधे उपस्थित होते. मुकणे धरणातून १४ कोटी रुपयांची लिफ्ट योजना मंजूर केल्यामुळे या भागातील सर्व शेतकरी बागायतदार होणार आहेत, जिल्हा नियोजनकडून चोवीस तास लाइट मिळविण्यासाठी निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण झाले आहे. माॅडेल तलाठी कार्यालय बनविण्यात आले असून यावर पवनचक्की बसविण्यात आली आहे. सीएसआर निधीतून ३७५ घरे मंजूर करून ही कामे प्रगतीपथावर आहेत. या सर्व घरांवर मोफत सोलर पॅनल बसविण्यात आले असून सौर चूल मोफत देण्यात आली आहे. हायस्कूलसाठी दोन वर्ग खोल्या मंजूर करून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. युवकांसाठी व्यायाम शाळेच्या साहित्याचा लोकार्पण सोहळा, कुशेगाव पिंपळवाडी येथील लोखंडी पूलाचा लोकार्पण सोहळा, किश्किंदानगरी रस्त्याचे भूमिपूजन, राघोजी भांगरे वस्तीतील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, गावातील दलित वस्तीत रस्ता काँक्रीटीकरण व सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, तीनही गावातील जेवणासाठी बनवलेल्या दोन सामाजिक सभागृह व विंचनरोडचा लोकार्पण सोहळा, मारुती मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन आदी विकास कामांचे भुमिपुजन व उदघाटन सोहळा पार पडला.

प्रास्ताविक करताना गोरख बोडके म्हणाले की, मोडाळे, शिरसाठे व कुशेगावची विकासकामे फक्त ना. छगनराव भुजबळ यांच्यामुळे झाली. आज जो कार्यक्रम घेतला आहे यात आमचा कुणालाही दुखवण्याचा उद्देश नसून फक्त विकास हेच आमचं ध्येय आहे. आदिवासी गावातील विकासकामे करून येथील प्रत्येक नागरिकाला रोजगार कसा मिळेल यासाठी मी काम करणार असल्याचे गोरख बोडके म्हणाले. यावेळी आगरी समाज, नाभिक समाज, दलित समाज यांनी भुजबळ यांना पाठींबा दिला. नवनिर्वाचित सरपंचाचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोडाळे सरपंच शिल्पा आहेर, शिरसाठे सरपंच सुनीता सदगीर, कुशेगाव सरपंच एकनाथ कातोरे, सदस्य गणेश ढोन्नर, मंदाबाई बोडके, ज्ञानेश्वर झोले, सुरेश लहानगे, आशा गांगड, सीताबाई जगताप यांच्यासह स्थानिक नेते अशोक आहेर, रघुनाथ बोडके, हरिदास सूर्यवंशी, भाऊसाहेब सूर्यवंशी, विष्णू कान्हव, बबन मेदडे, निवृत्ती शेंडगे, अंबादास धात्रक आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेविका ज्योती केदारे यांनी केले.

Similar Posts

error: Content is protected !!