खेड भैरव येथील पिण्याचे पाण्याचे दुखणे मिटले ; उपसरपंच खंडेराव जाधव यांच्या प्रयत्नांनी मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25
इगतपुरी तालुक्यातील मोठा विस्तार असलेल्या खेड भैरव गावात गेल्या २५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचे दुखणे महिला आणि गावकऱ्यांना भेडसावत होते. यामुळे दरवर्षी पाचवीला पुजलेली पाणीटंचाई सहन करण्यापलीकडे ग्रामस्थ काही करू शकत नव्हते. गावातील कुंभार विहिरीवर जेमतेम पाणी असतांना रात्रीच्या वेळी पुरेसे पाणी मिळवण्याचा प्रयत्न येथील महिला करायच्या. अशा परिस्थितीचे विदारक चित्र पाहून खेड भैरव ग्रामपंचायतीचे उपसरपंच खंडेराव गणपत जाधव यांचे अंतःकरण पिळवटून निघाले. त्यानुसार त्यांनी प्रयत्न सुरू केले. अल्पावधीतच अनेकांच्या साहाय्याने पाणी योजनेसाठी पाईप लाईनचे काम पूर्ण झाले. आज संपूर्ण गावातील घराघरात पिण्याचे पाणी पोहोचल्याने ग्रामस्थ महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. सर्व ग्रामस्थांच्या वतीने उपसरपंच, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
उपसरपंच खंडेराव गणपत जाधव यांनी आपल्या गावासाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी विविध प्रयत्न केले. येथील ग्रामस्थ जगन वाजे यांचे मार्गदर्शन, खेड भैरव ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अनमोल सहकार्य ह्या त्रिसूत्रीला आज यश आले. काळविहिर ते खेड भैरव अशी पिण्याच्या पाण्यासाठी पाईप लाईन टाकण्यात आली. हे काम पूर्ण होऊन संपूर्ण खेड भैरव गावात पिण्याचे शुद्ध पाणी घराघरात पोहोचले.
मोठ्या लोकवस्तीच्या तुलनेत आता पाणी तुटवडा अजिबात जाणवणार नाही. वर्षानुवर्षाचा मोठा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महिलांचे गाऱ्हाणे ऐकून त्यावर अंमलबजावणी करणारे उपसरपंच खंडेराव गणपत जाधव यांचे महिला आणि ग्रामस्थांनी आभार मानले.

महिलांतर्फे कृतज्ञता व्यक्त करते

गावातील महिला रात्र रात्र जागून टिपवणीचे थेंबे थेंबे पाणी भरायच्या. आमच्या महिला गावाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फक्त डोक्यावर हंडे घेऊन स्वतःच्या घरात पाणी घेऊन जायच्या. सार्वजनिक पाण्याची टाकी असतांना त्यात पाणी नव्हते. इतक्या वर्षांची पाण्यासाठी पायपिट करणाऱ्या आमच्या महिलांचे गाऱ्हाणे ऐकून उपसरपंच खंडेराव जाधव पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. समस्त महिलांतर्फे त्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत.
– सौ. सत्यभामा तुकाराम वाजे, ग्रामस्थ महिला खेड भैरव

ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचे सहकार्य मिळाले

उपसरपंच खंडेराव जाधव यांची गावाला पाणी मिळवून देण्याची तळमळ पाहून त्यांना वेळोवेळी सहकार्य केले. त्यांनीही अविरतपणे ह्या कामासाठी स्वतःला वाहून घेतले. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी सुद्धा मोलाची मदत केली. आज गावात मुबलक पाणी आलेले पाहून मनापासून आनंद झाला.
– जगन वाजे, ग्रामस्थ खेड भैरव

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!