भैरवनाथ महाराज यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही रद्द ; शासन निर्णयाला पिंपळगाव मोर ग्रामस्थांचा प्रतिसाद

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25 ( निलेश काळे, पिंपळगाव मोर )
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा सलग दुसऱ्या वर्षीही ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेवून रद्द केली. सालाबादप्रमाणे होणारी नियोजित यात्रा २३ ते २५ एप्रिल पर्यंत होणार होती.
पहिल्या दिवशी जागरण, दुसऱ्या दिवशी मिरवणूक यात्रा तर तिसऱ्या दिवशी कुस्त्यांची विराट दंगल होऊन यात्रेची सांगता होत असते. गत वर्षांपासून होवू घातलेल्या कोरोना महामारीमुळे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी भैरवनाथ महाराजांच्या काठीची विधीवत पूजा झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते. ग्रामस्थ आनंदाने ग्रामप्रदक्षिणा, काठीची मिरवणूक काढून भैरवनाथ मंदिराकडे प्रस्थान करत असतात. ह्यावर्षी हे चित्र दिसणार नाही.
यात्रेमध्ये परिसरातील गोड पदार्थांचे व्यावसायिक, खेळणे, कटलरी व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत असतात.यंदा यात्रा कमिटीने व्यावसायिकांना यात्रेत सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे. यात्रा म्हटलं की तमाशा व कुस्त्यांची दंगल असतेच. यात्रा रद्द झाल्यामुळे कुस्त्या व तमाशा प्रेक्षकांचा हिरमोड झाला असला तरीही आरोग्याच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले असून ग्रामस्थांनी एकमुखाने यात्रा बंद निर्णयाला प्रतिसाद दिला आहे. भैरवनाथ महाराज मंदिरात सकाळपासून सामाजिक अंतर पाळून तसेच शासनाच्या नियमांचे पाळून ग्रामस्थांनी लहान-मोठ्यांनी दर्शन घेतले.