
इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांनी अनुसुचित क्षेत्रातील ( पेसा ) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्यासंदर्भात अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्यानुषंगाने नाशिक जिल्ह्यात पोलीस पाटील / कोतवाल संवर्गातील रिक्तपदाची पदभरतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलीस पाटील / कोतवाल पदासाठी २२ ऑक्टोबरला लेखी परीक्षा घेणे प्रस्तावीत होते. मात्र बिगर आदिवासी आरक्षण हक्क बचाव संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली असून सर्वोच्च न्यायालयाचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पेसा क्षेत्रातील विहित करण्यात आलेल्या १७ संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया / नियुक्ती संदर्भात कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये असे महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत. तरी पोलीस पाटील / कोतवाल हे पद देखील अनुसुचित क्षेत्रातील ( पेसा ) १७ संवर्गाच्या सुचीतील असल्याने नाशिक जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत चालु असलेली पोलीस पाटील/ कोतवाल रिक्तपद भरती पुढील आदेशापावेतो स्थगित करण्यात येत आहे, याची पोलीस पाटील/ कोतवाल पदासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे नाशिकचे अपर जिल्हादंडाधिकारी राजेंद्र वाघ यांनी कळवले आहे.