नाशिक ग्रामीण पोलीसांचे अवैध व्यवसाय विरोधी अभियान : ८ दिवसांत ११९ आरोपींविरूध्द ७० गुन्हे दाखल

इगतपुरीनामा न्यूज – मागील काही महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांविरोधी अभियान छेडले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी, स्थापित करण्यात आलेल्या ८ विशेष पथकांसह अवैध दारू निर्मितीची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी मुख्यालयाकडून महिला पोलीस अंमलदारांची ३ पथके गठीत करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अवैध मटका-जुगार, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, अन्न भेसळ यासह सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाया करण्यात येत आहेत. नाशिक ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील गुटखा हद्यपार करण्यासाठी यापूर्वी तीन अभियान राबवले असून ६ ऑक्टोबर पासून गुटखा विरोधी अभियान ४.० सुरू करण्यात आले आहे. मागील ८ दिवसांत नाशिक ग्रामीण पोलीसांनी अवैध व्यवसायांविरूध्द ७० ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे. यात मुंबई दारूबंदी कायद्याखाली ३६, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली १५, गुटखा विरोधी १८ कारवायांचा समावेश असून निफाड पोलीस ठाणे हद्दीतील बोकडदरे शिवारात भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या इसमांवर अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पथकांनी केलेल्या कारवायांत एकूण ११९ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण १८ लाख १७ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी खबर ही हेल्पलाईन सुरू केली असून नागरिकांनी ६२६२२५६३६३ या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलीसांना द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!