इगतपुरीनामा न्यूज – मागील काही महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांविरोधी अभियान छेडले आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी स्थापित केलेल्या ८ विशेष पथकांसह जिल्ह्यातील सर्व ४० पोलीस स्टेशनमधील अधिकारी व अंमलदार या अभियानात हिरीरीने सहभाग घेत आहेत. याशिवाय जिल्ह्यातील अवैध दारू निर्मितीची ठिकाणे उध्वस्त करण्यासाठी मुख्यालयाकडून ४ महिला पथकांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. सदर कर्तव्यार्थ नेमण्यात आलेल्या महिला अंमलदार जिल्ह्यातील डोंगर दऱ्यांमध्ये फिरून अवैध दारू उत्पादनाची ठिकाणे उध्वस्त करत आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मटका, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, अन्न भेसळ यासह सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायावर कारवाया करण्यात येत आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा हद्दपार करण्यासाठी यापूर्वी ३ अभियान राबवले असून ६ ऑक्टोबरपासून गुटखा विरोधी अभियान ४.० सुरू करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांची गुटखा विरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान राबविण्यात येत आहे. गुटख्यासोबतच इतर सर्वच प्रकारच्या व्यवसायाविरुद्ध नाशिक ग्रामीण पोलिसांचे अभियान सुरूच राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध व्यवसायांची इत्यंभूत माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवून नाशिक ग्रामीण पोलिसांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार होण्यासाठी अशा अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी “खबर” ही हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी ६२६२२५६३६३ या हेल्पलाइनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना द्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.