इगतपुरीनामा न्यूज – कावनई येथील कपिलधारा येथील प्रसिध्द तीर्थक्षेत्री शिवमंदिर व राममंदिरात ऋषी पंचमी निमित्त स्नाना आणि शिव पुजनासाठी भाविकांची अलोट गर्दी पहावयास मिळत आहे. अधिक मासानंतर आता ऋषी पंचमी निमित्त हजारो भक्त महिला भाविकांनी स्नानाचा व शिव दर्शनाचा लाभ घेतल्याची माहिती विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी दिली. यावेळी मंदिराचे महंत रामनारायण दास फलाहारी महाराज व पुरणचंद्र दास उडिया महाराज उपस्थित होते. कपिलधारा तीर्थक्षेत्र या ठिकाणी फार प्राचीन काळापासून कुंभमेळ्याची सुरूवात होत असल्याने हे शिवतीर्थ व राम मंदिर प्रसिध्द आहे. या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी फार मोठी यात्रा भरते. भाद्रपद महिन्यातील तृतीया अर्थात हरितालिका पूजनानंतर चतुर्थीला पार्थिव गणेश पूजन केले जाते. आणि भाद्रपद पंचमी ही ऋषी पंचमी म्हणून ओळखली जाते. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही महिला करतात. या व्रताअंतर्गत दरवर्षी महिला पुजा व स्नानासाठी या तीर्थावर येतात. ऋषींबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमी सण साजरा केला जातो. हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्री व वशिष्ठ या सात ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या प्राचीन कपिलधारा तीर्थावर ऋषीपंचमी साजरी करण्यात येते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे यांनी पोलीस पथकासह चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group