आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या

लेखनइंजि. संदीप पांडागळे, कार्यकारी अभियंता, सा.बां. विभाग, धुळे, इंजि. हरिभाऊ गिते, अध्यक्ष, सरळ सेवा वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य

भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६० साली म्हैसुर राज्यात (आताचे कर्नाटक ) कोलार जिल्ह्यातील मुदेनहल्ली ता. चिकबल्लापूर येथे झाला. त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री हे संस्कृतचे पंडित व आयुर्वेद तज्ञ होते. त्यांच्या आईचे नांव व्यंकम्मा. सर विश्वेश्वरय्या १५ वर्षाचे असतांना त्यांचे वडील वारले. प्राथमिक शिक्षण चिकबल्लापूर येथे तर बंगळुर येथील सेंट्रल महाविद्यालयात पदवी शिक्षण पुर्ण केले. मद्रास विद्यापीठातुन 1881 मध्ये बीए केल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत, कॉलेज ऑफ सायन्स आताचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे ( सीओईपी ) येथुन 1883 मध्ये आत्ताच्या बीई परीक्षेच्या समकक्ष असणाऱ्या एलसीई आणि एफसीई परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्या. स्थापत्य अभियांत्रिकीतील शिक्षण पुर्ण होताच ब्रिटिशांनी त्यांना मुंबई इलाख्यात सहाय्यक अभियंता या पदावर रुजु करुन घेतले. त्यांची पहिली नेमणुक नाशिक, धुळे परिसरात झाली. स्थापत्य अभियांत्रिकीतील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या पुर्णत्वास नेले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. 1904 मध्ये शासनाने त्यांना आरोग्य अभियंता या पदावर बढती दिली.

सिंध प्रांतात सिंधु नदीवर सक्कर बॅरेजची निर्मिती करुन सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावून सिंध शहराचा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था पुर्ण करण्यात त्यांचा मोठा सहभाग आहे. म्हैसुर राज्यात कावेरी नदीवर 50 टिएमसी क्षमतेचा 60 मेगॉव्हॅट जलविद्युत निर्मितीचा दीड लाख एकरापेक्षा जास्त क्षेत्राला सिंचन सुविधा देणारा त्यावेळचा सर्वात मोठा जलाशय त्यांनी निर्माण केला. हे धरण कृष्णराज सागर जलाशय म्हणुन ओळखले जाते. 1938 ला गांधीजींच्या सांगण्यावरुन विश्वेश्वरय्या ओरिसाला पुराच्या विळख्यातुन सोडवण्यासाठी गेले. त्यांच्या पुर नियंत्रण योजनेनुसार महानदीवर देशातील सर्वात जास्त लांबीचे हिराकुंड धरण बांध्ण्यात आले. भारताला समृध्द, संपन्न कसे करावे, दारिद्र्यमुक्त कसे करावे, या चिंतनात ते सतत असत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांनी स्वत:च्या खाजगी खर्चाने परदेश दौरे केले.

पुण्याजवळील खडकवासला धरणाची उंची न वाढवता पाणी साठा वाढवण्यासाठी, पुणे शहराला मुठा नदीच्या पुरापासुन दिलासा देण्यासाठी स्वयंचलित दरवाजे बसविण्याची योजना त्यांनी कार्यान्वित केली. या दरवाज्यांचे पेटंट त्यांना मिळाले पण त्याची रॉयल्टी त्यांनी घेतली नाही. देशात आणि देशाबाहेर सांडपाणी व्यवस्था निर्माण करण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. “औद्योगिकरणाची कास धरा अथवा विनाशासाठी तयार रहा” ( Industrialise or Perish) ही घोषणा देऊन त्यांनी भारताला औद्योगिकरणाची दिशा दाखवुन देशाला खऱ्या अर्थाने विकासाचा एक नवीन मार्ग दाखवुन दिला. भारतातील बरेचसे उद्योग व व्यवसाय सुरु करण्याचे श्रेय त्यांना जाते. औद्योगिक प्रगती भक्कम पायावर उभारायची असेल तर पाया मजबुत असावा अशी त्यांची धारणा होती. ती मजबुत करण्यासाठी शिक्षण, लोखंड, पोलाद उद्योग, विद्युत निर्मिती, दळणवळणाच्या साधनांचा विकास, बँकांचा विकास, धरणे बांधुन जलसंचय वाढवण्याच्या योजनांवर त्यांनी विशेष भर दिला. म्हैसुर मधील पोलाद कारखान्याची निर्मिती आणि वृद्धी टाटांनी जवळुन पाहिली होती. अशाच प्रकारचा कारखाना टाटांनी जमशेदपुरला निर्माण केला होता. विश्वेश्वरय्या सारख्या एका तज्ञ प्रशासकाचा सहभाग टाटा उद्योग समुहाकडे असावा असे वाटुन टाटांनी विश्वेश्वरय्यांना संचालक पदावर घेतले. निवृत्तीनंतर सतत 28 वर्ष ते टाटा उद्योग समुहाबरोबर मार्गदर्शक या नात्याने राहीले. भद्रावती लोखंड पोलाद उद्योग, जोग जलविद्युत निर्मिती योजना, बँक ऑफ म्हैसुरची स्थापना, नॅरो गेज व मीटर गेज रेल्वे प्रकल्प, भटकल येथील बंदर विकास योजना. विमानाचा कारखाना आणि पायाभुत संस्थांची उभारणी त्यांनी केली. त्यांनी निव्वळ पायाभुत औद्योगिक संस्थाच सुरु केल्या नाहीत तर म्हैसुर सॅडल सोप, रेशीम उद्योग, कागद उद्योग, हॉटेल व्यवसाय, छपाई उद्योग, चंदनाचे तेल, धातु, चामडे, साखर या सारखे उपयोग्य वस्तुंचे कारखाने स्थापुन औद्योगिकरणाला चालना दिली.

उद्योग व व्यवसायांना चांगले स्थैर्य प्राप्त होण्यासाठी त्यांच्या संघटना स्थापण्यावर त्यांनी विशेष भर दिला. म्हैसुर चेंबर ऑफ कॉमर्स, ऑल इंडिया मॅन्युफक्चरींग ऑर्गनायजेशन या संस्थांच्या स्थापनेतही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. अर्थशास्त्रीय परिषद, सर्वदलीय परिषद, भारतीय विज्ञान काँग्रेस सारख्या संस्थांचे अध्यक्षपद त्यांनी सांभाळले आहे. म्हैसुरचे दिवाणपद स्विकारण्या आधी त्यांनी सर्व नातेवाईकांना घरी जेवणास बोलावून स्पष्टपणे सांगितले की हे प्रतिष्ठित दिवाणपद ते एका अटीवर स्विकारतील की, एकही नातलग त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन कामासंदर्भात शिफारशीसाठी येणार नाहीत. 1912 मध्ये म्हैसुरचे दिवाण म्हणुन त्यांची नेमणुक झाल्यानंतर कावेरी नदीच्या पाण्याचे त्यांनी सर्व्हेक्षण केले. अमेरिकेतील तेन्सी व्हॅली अकॅडमीच्या मॉडेलवरुन डिझाईन केले. याचा उपयोग म्हैसुरच्या मंड्या जिल्हाला फक्त इरिगेशनसाठीच नाही तर त्यातील कारखान्यासाठी वीज निर्माण करण्यासाठी झाला. सर एम. व्ही यांनी म्हैसुर विद्यापीठाची स्थापना आणि बेंगलोरमध्ये इंजिनिअरींग तसेच हेब्बलमध्ये ॲग्रीकल्चर कॉलेज सुरु केले. उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण दिल्याशिवाय प्रगती होणार नाही अशी त्यांची खात्री होती. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या खर्चाने बेंगलोरला जयचामराजेंद्र वोडीयार पॉलीटेक्निक सुरु केले. म्हैसुरचे दिवाण असतांना त्यांनी 1912-1918 या काळात कन्नड भाषेतुन शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग चालवले, शेती शाळा काढल्या, शेतकी प्रयोग परिसर स्थापले, ग्रामीण वाचनालये उघडली. त्यांनी कन्नड साहित्य परिषदेची स्थापना केली. विज्ञानाचा प्रसार कन्नड ह्या लोकभाषेतुन करण्यासाठी विज्ञानाची पुस्तके लिहुन प्रकाशित केली. म्हैसुरच्या दिवाण पदावरुन 1918 साली स्वेच्छेने निवृत्त झाल्यानंतर सुध्दा ते सतत काम करत राहीले. वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने टपाल तिकीट काढले.

सर विश्वेश्वरय्या यांनी केलेली विशेष महत्वाची कामे 1) ॲटोमॅटिक गेटचे डिझाईन संशोधन, निर्मीती, पेटंट, त्यानंतर त्याचे स्वा‍मित्वधन स्विकारले नाही. खडकवासला, राधानगरी, टायमरा, कृष्णराजसागर आदी ठिकाणी ही गेटस् बसविली. 2) ब्लॉक सिस्टिम पांझरा नदीवरील व फडपध्दत पाहुन, अभ्यासुन त्यावरुन ‘ब्लॉक पध्दत’ डिझाईन केली. त्याला मंजुरी मिळवून पुणे जिल्ह्यात नीरा नदीच्या डाव्या कालव्यावर प्रथम तिची अंमलबजावणी. नंतर महाराष्ट्रात नीराबरोबरच प्रवरा व मुळा नदीवर तर म्हैसुर संस्थानात सुमारे 2500 ठिकाणी जुन्या बंधाऱ्यांवर (अनिकट) तसेच नवीन बंधारे व कालव्यांवर उभारणी. 3) सायफन पध्दतीचा वापर पाणी समपातळी गाळते हा गुणधर्म पुर्वीपासुन माहित होता. राजेरजवाड्यांनी किल्ले व राजवाडे ह्यामध्ये हे तत्व वापरले होते. तथापी पाण्याच्या ह्या गुणधर्माचा वापर करुन सामान्य माणसासाठी पाणीपुरवठा ( धुळे योजना ) आणि शेतीच्या सिंचनासाठी पाणी ( दातर्ती सायफन ) येथे त्यांनी केलेला वापर हे त्यांच्या कुशाग्र बध्दिमत्ता व तंत्रज्ञानाचे फलित होते. 4) कृष्णराजसागर सिंचन उद्योगासाठी वीज व प्रचंड जलसाठा निर्माण करुन वेगवेगळ्या छोट्या बंधाऱ्यांना ( अनिकटचा ) वापर करुन ब्लॉक पध्दतीच्या वापरातुन जलवाटप व व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण तसेच वृंदावन गार्डन सारख्या सुंदर वास्तुची निर्मिती. 5) भद्रावती स्टील मोठया उद्योग धंद्याच्या वाटचालीतील ‘महत्वाचे पाऊल’ 1955 मध्ये भारत सरकारचा “भारतरत्न” हा देशाचा सर्वोच्च किताब राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांचे हस्ते सर एम. व्ही. यांना प्रदान करण्यात आला. 14 एप्रिल 1962 रोजी वयाच्या 101 व्या वर्षी सर एम. व्ही. यांचे निधन झाले. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणुन देशभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 1998 पासुन त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणुन साजरा केला जातो. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणुन त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे. सर विश्वेश्वरय्या हे एखाद्या वटवृक्षासारखे आहेत. त्यांचा भुतकाळ व पाळेमुळे ही भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. त्यांची नजर प्रगत संपन्न सुशिक्षित अशा भारताचा वेध घेत आहे. त्यांच्या एकेका कार्याचे आणि कृतीचे केवळ दर्शन आणि स्मरण हेही आपल्यासाठी पवित्र आणि पुण्यदायी आहे.

Similar Posts

error: Content is protected !!