इगतपुरीच्या शिरपेचात मानाचा तुरा ; मोडाळेच्या शिक्षिका माधुरी पाटील यांना राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार : राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी दिल्या शुभेच्छा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील मोडाळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका माधुरी केवळराव पाटील यांना यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे. १ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. इगतपुरी तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील शाळांत त्यांनी प्रभावी काम केले आहे. विद्यार्थ्यांतील कलागुण ओळखत त्यांना तंत्रज्ञानाचे धडे देऊन शिक्षणाने सदृढ विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत. यासह विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या स्वरचित कविता विविध ठिकाणी प्रसिद्ध आहेत. राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इगतपुरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत मोडाळे गावाची शान वाढवणाऱ्या माधुरी पाटील यांचे राष्ट्रवादीचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी शिक्षक दिनी सायंकाळी ४ वाजता टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्टस्, नरीमन पॉइंट, मुंबई येथे होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर, पालकमंत्री, खासदार, आमदार आदी उपस्थित राहणार आहेत.

Similar Posts

error: Content is protected !!