“मुंघ्यार” लघुपटाला राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचा पुरस्कार : जुलमी प्रथेविरुद्ध आणि जातव्यवस्थेमुळे भेदभावाला बळी पडलेल्यांची मार्मिक कथा असणारा लघुपट

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३०

राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या ७ व्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत दिग्दर्शक आणि निर्माता निलेश आंबेडकर यांच्या “मुंघ्यार” या मराठी लघुपटाला बक्षीस घोषित झाले आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंघ्यारला या स्पर्धेत तिसरे बक्षीस मिळाले असून रुपये एक लाख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार लघुपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता यांना दिला जाणार आहे. मुंघ्यार जातपंचायतीच्या जुलमी प्रथेविरुद्ध आणि जातव्यवस्थेमुळे  भेदभावाला बळी पडलेल्यांची एक मार्मिक कथा आहे, जी जीवनाचा हक्क, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठेचे बद्दल भाष्य करतो.

देशभरातून १९० लघुपटांचा सहभाग असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्राचा आणि मराठी लघुपटाचा गौरव होणे हे कौतुकास्पद आहे. मधुरा मोरे, राहुल सोनवणे, सचिन धारणकर, तिलोत्तमा बाविस्कर, सिद्धार्थ सपकाळे, अनुप ढेकणे, आरती बोराडे, दीपाली मोरे, नितीन जाधव, अविनाश जुमडे, भोरु कुंदे या कलाकारांच्या मुख्य भूमिका या लघुपटात आहेत. मनोहर दौंड यांनी चित्रीकरण, मयूर सातपुते यांनी संपादन, शशिकांत कांबळी यांनी संगीत, गीत चरण जाधव तर पार्श्वगायन रुपाली कदम यांनी केले आहे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग यांनी आयोजित केलेल्या या लघुपट स्पर्धेचे उद्दिष्ट मानवी हक्कांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी सिनेमॅटिक आणि सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना मान्यता देणे हे आहे. पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा महोत्सव आणि  पुरस्कार सोहळा लवकरच दिल्लीत होणार आहे. मुंघ्यारच्या या यशामुळे महाराष्ट्राने आपला ठसा दिल्लीत अबाधीत ठेवला आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!