महिलांनी उभी केलेली श्री स्वामी समर्थ सूतगिरणी राज्याला प्रेरणादायी – खासदार भाऊसाहेब वाकचौरे : डिसेंबरपासून सूतगिरणीचे उत्पादन सुरु होणार – दलितमित्र डॉ. अशोकराव माने

इगतपुरीनामा न्यूज – दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांच्या मार्गदर्शनाने रणरागिणी महिलांनी श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती सहकारी सूतगिरणी उभी केली आहे. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे हे दैदीप्यमान कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. २४ वर्षांपूर्वी लावलेले हे रोपटे आता मोठ्या वृक्षात परिवर्तीत होऊन मधुर फळे द्यायला सज्ज झाले आहे. महिलांचे सक्षम नेतृत्व म्हणून चेअरमन डॉ. नीता माने यांचा करावा तेवढा गौरव कमीच आहे. कार्यकारी संचालक सुहास राजमाने यांनी आपल्या कुशलतेने ह्या कामाला मोठे सहाय्य केलेले आहे. राज्यातील महिलांसाठी आदर्श असणाऱ्या ह्या सूतगिरणीमुळे सर्वांची मान उंचावली आहे. दलितमित्र डॉ. अशोकराव माने हे आगामी काळात आमदार व्हावेत यासाठी त्यांना लागेल ते सहाय्य देऊ असे प्रतिपादन शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. नाशिक जिल्ह्यात दुर्गम असणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे श्री स्वामी समर्थ अनुसूचित जाती सहकारी सूतगिरणीच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. समृद्धी महामार्ग, कनेक्टविटी, बाजारपेठ यांच्याशी संतुलन साधणारा हा प्रकल्प काही महिन्यात पूर्णत्वाला जाणार आहे. सहकारातून महिलांनी निर्माण केलेले हे काम हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे असल्याचेही ते म्हणाले.

सूतगिरणीत यंत्रसामग्रीचे काम प्रगतीपथावर असून ही सूतगिरणी डिसेंबरमध्ये उत्पादनाखाली आलेली दिसेल. या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री विनय कोरे ( सावकार ) यांनी व्यक्तिशः सर्वोतोपरी मदत केलेली आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ. अशोकराव माने बापू यांनी यावेळी दिली. संस्थेच्या चेअरमन डॉ. नीता अभिजित माने सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, युवा नेते रोहित वाकचौरे, उद्योगपती मारुती गायकवाड, बिल्डर प्रल्हाद माने, म्हाडाचे अधिकारी किशोर गायकवाड, कायदेशीर सल्लागार ॲड. शिवाजी लंके, निवृत्त पोलीस अधीक्षक विलास भोसले यांचे मनोगत झाले. प्रारंभी विषय पत्रिका वाचन कार्यकारी संचालक सुहास लालासाहेब राजमाने यांनी केले. यावेळी सभासदांनी हात उंचावून सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. सभेप्रसंगी व्हॉइस चेअरमन संघमित्रा गजरे, संचालिका रजनी रोकडे, सुनीता चव्हाण, रुपाली राजमाने, सरस्वती वाकचौरे, पूजा वाकचौरे, संपदा गजरे, सुमन लंके, इंजि. दिनेश सनगर, गौरव तोरस्कर, रघुनाथ महाडिक, दत्तू काळे, सुरेश बोराडे, संतोष माने यांच्यासह महिला सभासद, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या संचालिका रुपाली राजमाने यांनी आभार मानले.

Similar Posts

error: Content is protected !!