विजचोरांची महावितरणकडून धर ‘पकड’ : विंचूर विभागात ३६ हजार युनिटची वीजचोरी पकडण्यात पथकाला यश ; दहा लाखांचा दंड

चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज – विजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने कडक पाऊले उचलली असून विंचूर उपविभागात राबविलेल्या धडक कारवाईत १८ विजचोरांना पकडण्यात महावितरणच्या भरारी पथकाला यश आले आहे.  या कारवाईत विजचोरांना दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सुमारे ३६००० युनिटची वीजचोरी पकडली असून एका दिवसात पकडण्यात आलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई ठरली आहे. ह्या कारवाईत केबल, मिटर, हिटर, शेगडी जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे विजचोरांचे धाबे दणाणले आहे.अलीकडे रोहित्र जळण्याचे प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे महावितरण यंत्रणेवर ताण निर्माण झालेला आहे. वाढता विजेचा वापर आणि त्यामानाने कमी येणारे बिल तफावत निर्माण करणारे ठरले असल्याने वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने महावितरणचे विजचोरांना शॉक ट्रीटमेंट हाती घेतली आहे.

त्यामुळे महावितरणच्या लासलगाव विभागातील विंचूर उपविभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विजचोरांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. कमी वीज आलेल्या व संशयित वाटणाऱ्या विजग्राहकांच्या घरी या धाडी टाकण्यात येत आहे. यासाठी सहा. अभियंता किरण काकड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने विंचूरमध्ये केलेल्या कारवाईत १८ विजचोरांना पकडण्यात आले आहे. या आकडे बहाद्दरांनी ३६ हजार वीज युनिटची चोरी केली आहे. त्यासाठी त्यांना दहा लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी सुमारे पावणे सहा लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर दंड न भरणाऱ्या ग्राहकांविरोआधात भारतीय विद्युत कायद्यानुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती किरण काकड यांनी दिली. मीटरमध्ये फेरफार करणे, आकडा टाकून शेगडी वापरणे, अशा विविध क्लृप्त्या करून ग्राहकांनी वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. अधिकृत वीज जोडणी असतांना देखील वीजचोरी आढळल्याने या पथकाने त्यांच्यावर जप्ती व दंडात्मक कारवाई केली आहे. चांदवड येथील कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, उप कार्यकारी अभियंता प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. अभियंता किरण काकड, अनुजा जाधव यांच्यासह श्रीराम आघाव, शैलेंद्र ओतारी, साईराज अहिरे, दत्तू खाडे, वैभव दरेकर, मनोज अढंगळे, रोशन लुकारे, रमेश साळवे,  कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. प्रामाणिकपणे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

विंचूर उपविभागात वीजचोरी पकडण्याचे सत्र सुरूच राहील. ग्राहकांनी नियमित वीजबिल भरावे व वीजचोरी करू नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. वीजचोरी केल्यास दंडात्मक कारवाई केली जात असून दंड न भरल्यास फौजदारी गुन्हे करण्यात येणार आहेत.
- किरण काकड, सहा. अभियंता, विंचूर उपविभाग

Similar Posts

error: Content is protected !!