इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
भारत सरकार, सूचना व प्रसारण मंत्रालय व प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे ( महाराष्ट्र व गोवा राज्य ) तथा क्षेत्रीय प्रचार कार्यालय नाशिक यांच्या वतीने “आझादी के ७५ साल” अर्थात “स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव” सुरू आहे. यानिमित्ताने आनंदतरंग फाऊंडेशन वाघेरे- नाशिक शाहीर उत्तम गायकर सहकारी यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम इगतपुरी पंचायत समितीमध्ये संपन्न झाला!
कार्यक्रमात हिंदी, मराठी देशभक्तीपर गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करतांना शहिदांच्या आठवणी, त्यांचे कार्य, त्याग, केलेले बलिदान, यांचे स्मरण करतांना मानाचा मुजरा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची छक्कड, संत तुकडोजी महाराज यांचा मर्मावर वार करत अधिकारी, कर्मचारी, राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या पोवाड्याला विशेष दाद मिळाली.
याप्रसंगी सभापती सोमनाथ जोशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, माजी उपसभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, माजी तालुकाप्रमुख राजेंद्र नाठे, नंदलाल भागडे, जेष्ठ नेते रघुनाथ तोकडे, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष जगदीश कदम, कार्यकर्ते, अधिकारी, ग्रामसेवक, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर शाहीर उत्तम गायकर, शंकरराव दाभाडे, देविदास साळवे, नामदेव गणाचार्य, दुर्गेश गायकर, प्रशांत भिसे, सागर भोर यांचे बरोबरच भारत सरकार, युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्राचे तालुका युवा स्वयंसेवक ओमकार गायकर ह्या कलावंतांचा पुष्पगुच्छ,शाल-श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने छाया पाटील यांनी शाहीर उत्तम गायकर यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने सांगता झाली .