इगतपुरीनामा न्यूज, दि. 22 ( वाल्मिक गवांदे, इगतपुरी )
इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार घोटीत ९ दिवस जनता कर्फ्यूचे कडेकोट नियम लागू करण्यात आले आहे. भाजीपाल्यासह सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे. घोटीचे सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या नेतृत्वाखाली घोटी पोलिसांनी शहरातील महत्वाच्या ठिकाणी रूट मार्च करून परेड करण्यात आली. सर्वरर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ९ दिवसाच्या जनता कर्फ्यूचा निर्णय घोटी ग्रामपालिकेकडून घेण्यात आल्याने घोटीकरांनी कडकडीत बंद पाळला. नागरिकांनी सुरक्षितता बाळगुन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहकार्य करण्याची अपेक्षा ग्रामपालिका व पोलीस प्रशासनाने व्यक्त केली होती.
घोटीत ठरल्याप्रमाणे सर्वच दुकानदार व व्यापारी बांधवांनी ९ दिवस जनता कर्फ्यूच्या बंदमध्ये सहभाग घेतला. अत्यावश्यक सेवेमध्ये फक्त हॉस्पिटल व मेडिकल सेवा सुरू असुन अन्य साहित्याची दुकाने बंदच होती. स्थानिक नागरीकांनी जनता कर्फ्यूत सकारात्मक प्रतिसाद दिला. शासकीय नियमांचे पालन करून बाजारपेठ पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार घोटी ग्रामपालिकेने घेतला असून या आदेशाचे पालन सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे.
याबरोबरच राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम उत्सव पुर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गौतम तायडे, संजय कवडे यांच्यासह पोलीस पथकाने घोटी बाजारपेठेत रूट मार्च काढुन परेड केली.