इगतपुरीनामा न्यूज – महाराष्ट्राच्या शैक्षणिक गुणवत्तेत इतर जिल्ह्यासह नाशिक जिल्हाही अग्रेसर होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही सुरु करावी असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्यासह आमदार सत्यजित तांबे यांची जिल्हा परिषदेत बैठक झाली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण विभाग व संघटनांना एकत्रितपणे काम करावे लागेल असेही आमदार तांबे यावेळी म्हणाले. नवीन शैक्षणिक वर्षात पात्र मुख्याध्यापक, पदवीधर व केंद्रप्रमुख यांना पदोन्नती द्यावी. रिक्त पदांसह इतर सर्व पदे ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के अभावीतपणे भरावे. वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीची पदे मान्य करून चटोपाध्याय आयोग लागू करावा. वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव लवकर मागवावे. आगाऊ वेतनवाढीसाठी मंजूर शिक्षकांना न्यायालयाच्या आदेशानुसार वेतनवाढ द्यावी आदी महत्वाच्या मागण्यांकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण विभागाचे लक्ष वेधले.
जिल्ह्यात मोठ्या संख्येने प्राथमिक शिक्षकांचे आर्थिक फरक, वैद्यकीय देयके व सेवानिवृत्त शिक्षकांचे देयके निधीअभावी प्रलंबित आहेत. या सर्व देयकांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्याची रक्कम संबंधितांच्या खात्यात तातडीने वर्ग करावी. सर्वांचे वेतन वेळेत देण्यात यावे. अनेक शाळांमध्ये मंजूर शिक्षक संख्येपेक्षा कार्यरत शिक्षकांची संख्या कमी आहे. तसेच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक यांना प्रभारी चार्ज देण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना सेवापुस्तक, गोपनीय अहवाल व सेवानिवृत्ती ( पेन्शन ) यांसारख्या प्रशासकीय कामांत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळत आहेत. त्यासाठी मोठा विलंब सहन करावा लागत आहे. उच्च न्यायालयाचे निकाल असूनही शिक्षण विभाग कार्यवाहीसाठी टाळाटाळ करत आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या आमदार सत्यजीत तांबे यांनी बैठकीद्वारे निदर्शनास आणून दिल्या . बैठकीवेळी मुख्य लेखाधिकारी महेश बच्छाव, जगदाळे, उप शिक्षणाधिकारी धनंजय कोळी, कार्यालयीन अधीक्षक दराडे, शिक्षण विस्ताराधिकारी संतोष झोले व विविध शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.