कत्तलीसाठी जाणारी जनावरे आणि २ वाहने इगतपुरी पोलिसांकडून हस्तगत; चौघांवर गुन्हा दाखल : पोलीस निरीक्षक राजू सुर्वे आणि पथकाचे एसपी शहाजी उमाप यांच्याकडून कौतुक

१७ लाख २७ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

इगतपुरीनामा न्यूज – आज शनिवारी इगतपुरी तालुक्यातील बोरटेंभे फाटा, पिंप्री फाटा भागातून इगतपुरीचे दबंग पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कत्तलीसाठी गोवंश जनावरे वाहून नेणारी दोन वाहने ताब्यात घेतली आहे. संबंधित ४ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा रजि. नं. ११३/२०२३ नोंदवण्यात आला आहे. या घटनेत १७ लाख २७ हजार किमतीची जनावरे आणि २ वाहने जप्त करण्यात आली आहेत. संशयित आरोपी छोटा हत्ती गाडी क्र. एमएच ०४ जी आर २०८६ वरील चालक ( नाव गाव माहीत नाही ), २) करण चमण सोंडवले, रा. खिडमक्ता, ब्रम्हपुरी, ता. धम्मपुरी जि. चंद्रपुर, किन्नर सनी बदु कापडे रा. कल्याण कोनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे, साजीद इसा शेख रा. प्रसोपन ता. नेर, जि. यवतमाळ हे आपसात संगनमत करुन महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली गोवंश जनावरे वाहनात भरली. त्यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकी बाबत कोणताही शासकीय परवाना नसतांनाही छोटा हत्ती गाडी क्रमांक एमएच ०४ जीआर २०८६ आणि अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच ०४ केयु ४७४३ मध्ये डांगी बैल, वासरू, म्हशी, म्हशीचे पारडे आदी जनावरे भरुन त्यांची वाहतुक करताना सापडले. म्हणून नरेश सुभाष लहाने वय २२, रा. गिरणारे, ता. इगतपुरी यांच्या फिर्यादीनुसार भारतीय प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि भादवि कलमाप्रमाणे इगतपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दबंग पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्याकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. नाशिकचे पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी राजू सुर्वे यांच्या कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!