इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ जागांवर विजय मिळवून शेतकरी विकास पॅनलने आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानंतर आज सभापती आणि उपसभापतींची निवड करण्यात आली. सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने तर उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्राधिकृत अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक प्रेरणा शिवदास यांनी कामकाज पाहिले. बाजार समितीचे सचिव जितेंद्र सांगळे यांनी त्यांना सहाय्य केले. घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सभापती व उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी एकमेव ज्ञानेश्वर लहाने यांचे नामनिर्देशन पत्र तर उपसभापती पदासाठी एकमेव शिवाजी शिरसाठ यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. नामनिर्देशन पत्र छाननी व माघार झाल्यावर एकमेव उमेदवार असल्याने सभापतीपदी ज्ञानेश्वर लहाने व उपसभापतीपदी शिवाजी शिरसाठ यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत १८ पैकी १६ शेतकरी विकास पॅनलला तर २ जागा शेतकरी परिवर्तन पॅनलला मिळाल्या होत्या. शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना ( ठाकरे गट ) उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर लहाने आदींनी केले होते. निवडीप्रसंगी शेतकरी विकास पॅनलचे संचालक निवृत्ती भिकाजी जाधव, सुनील रामचंद्र जाधव, हरिदास नरहरी लोहकरे, अर्जुन सयाजी पोरजे, रमेश सदाशिव जाधव, भाऊसाहेब पांडुरंग कडभाने, सुनीता संदीप गुळवे, आशा भाऊसाहेब खातळे, राजाराम बाबुराव धोंगडे, अर्जुन निवृत्ती भोर, संपत किसन वाजे, भरत सखाराम आरोटे, नंदलाल चंपालाल पिचा, रमेश खंडू जाधव, शेतकरी परिवर्तन पॅनलचे संचालक दिलीप विष्णू चौधरी, ॲड. मारुती रामभाऊ आघाण उपस्थित होते. नूतन पदाधिकाऱ्यांचे इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.