
इगतपुरीनामा न्यूज – घोटीत लग्नासाठी आलेल्या युवकाचा खुन करणाऱ्या तीन संशयित आरोपींना इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पथकाने जेरबंद केले आहे. संदीप शांताराम निकाळे, वय ३६ रा. भागीरथी पार्क, कात्रप बदलापूर ता. अंबरनाथ जि. ठाणे, सागर चंदु सोनवणे, वय २७ रा. गोंदे दुमाला, सिद्धार्थ नगर, ता. इगतपुरी, अमोल राजाराम पवार, वय ३० रा. कुऱ्हेगाव ता. इगतपुरी अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. गुन्ह्यात वापरलेली स्कार्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. खुनाचा गुन्हा घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने या तीनही आरोपींना घोटी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी ही कामगिरी केली आहे. घोटी येथील रेल्वे स्टेशन परिसरात नातेवाईकाच्या लग्नासाठी टिटवाळा येथून आलेल्या अनिकेत शिंदे या युवकाचा रविवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा येथे खुन करण्यात आला होता. याबाबत गणेश देवीदास जगताप, रा. वसंत पवार नगर, इगतपुरी यांनी फिर्याद दिली होती. मागील भांडणाच्या कुरापतीमुळे खुन करून संशयित आरोपी फरार झाले होते. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.