इगतपुरीनामा न्यूज, दि. १८
राज्य सरकार व प्रशासनाच्या नवीन नियमावलीनुसार सर्वत्र शाळांचे वर्ग सुरू झाले आहेत. इगतपुरी तालुक्यातही १५ डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाले आहेत. तब्बल दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचत असले तर सार्वजनिक वाहतुकीमुळे शिक्षकांना शाळा गाठायला अडथळा येत आहे. यासह अतिरीक्त कामाच्या बोज्यांमुळे शिक्षक बेजार झाले आहेत. इगतपुरी रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा देऊन मासिक पास सुरू करण्याची मागणी होत आहे. बससेवा सुरू करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ देण्यासाठी शिक्षकांसह नोकरदारांसाठी शासनाने पावले उचलावी अशी आग्रही मागणी आहे.
कोरोना काळात बहुतेक शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन केले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने १५ डिसेंबरपासून प्रत्यक्ष शाळा झाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. असे असले तरीही शिक्षकांना नाशिकहून इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज यावे लागते. संपामुळे बससेवा बंद तसेच रेल्वेचे थांबे देखील बंद असल्याने शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एक तासाच्या प्रवासाला तब्बल दोन-अडीच तास लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ह्या वाया जाणाऱ्या वेळेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
बससेवा सुरळीत सुरू करावी. रेल्वे गाड्यांना इगतपुरीला थांबा देऊन मासिक पास सुरू करावा. असे केल्यास प्रवासात जाणारा जास्तीचा वेळ विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनात उपयोगी येईल. दररोज जास्तीचा करावा लागणारा प्रवास बस व रेल्वेने झाला तर उर्वरित वेळ विद्यार्थ्यांसाठी उपयोगात येईल अभ्यासाची राहिलेली पोकळी भरून काढण्यास मदत होईल.
- भाऊलाल पवार, शिक्षक
वाया गेलेला अभ्यास भरून काढण्यासाठी आम्हा शिक्षकांना अतिरिक्त वेळ देऊन विद्यार्थ्यांना शिकवावे लागत आहे. अभ्यासामध्ये २ वर्षाचे अंतर पडल्याने विद्यार्थ्यांना मार्गावर आणणे महत्वाचे आहे. त्यासाठी शिक्षकांचा वेळ प्रवासात जाऊ नये यासाठी शासनाने नियोजन करणे आवश्यक आहे.
- सविता मौले, शिक्षिका