इगतपुरीतील कुख्यात गँगस्टर ग्रामीण पोलीसांच्या जाळ्यात : इगतपुरी पोलीस व विशेष पथकाच्या “सिंघम” कामगिरीला यश

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२० मध्ये संजय बबन धामणे, रा. सुमंगल रेसिडन्सी, डाक बंगला, इगतपुरी यास इगतपुरी शहरातील कुख्यात डेव्हीड गँगचे सदस्यांनी तीक्ष्ण हत्याराने पोटावर, छातीवर, तोंडावर मारहाण करून जीवे ठार मारले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये देखील डेव्हीड गँगच्या सदरस्यांनी झाकीया मेहमुद शेख, रा. गायकवाड नगर, इगतपुरी या महिलेवर धारदार चाकूने वार करून तिचा निर्घृण खून केला होता. ह्या दोन्हीबाबत पोलिसांनी भादवि कलम ३०२, १२०-ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहरातील कुख्यात डेव्हीड गँगच्या सदस्यांविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) १९९९ चे कलम ३ (१), (११), ३(२), ३(४) अन्वये कारवाई करण्यात आली होती. त्यात डेव्हीड गँगचे सदस्य नामे १) जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा, व २) अजय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आज्या, दोघे रा. गायकवाड नगर, इगतपुरी हे गुन्हे घडल्यापासून फरार होते. इगतपुरी शहरातील सर्वसामान्य नागरीक, रेल्वे स्टेशन परिसरातील स्टॉलधारक, व्यावसायिकांमध्ये डेव्हीड गँगच्या वरील कुख्यात गुन्हेगारांच्या धाक दडपशाहीमुळे दहशहतीचे वातावरण निर्माण झालेले होते. यातील गुन्हेगारांवर इगतपुरी पोलीस ठाण्यासह, इगतपुरी रेल्वे, कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी लुटमार, चोरी, गंभीर दुखापत, भारतीय हत्यार कायदा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी ह्या कुख्यात गुन्हेगारांचा शोध घेवून अटक करण्यासाठी इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना सूचना दिल्या होत्या. त्यांचे मदतीस सपोनि विकास ढोकरे यांच्यासह निवडक पोलीस अंमलदारांचे पथक देण्यात आले होते. यातील कुख्यात गुन्हेगार हे गुन्हा घडल्यापासून मुंबई, पुणे, औरंगाबाद तसेच कर्नाटक राज्यात आपले अस्तित्व लपवत वास्तव्य करत होते. मागील दोन महिन्यांपासून नाशिक ग्रामीण पोलीस हे त्यांचा शोध घेत होते. दरम्यान पोलीस पथकातील अधिकारी व अंमलदारांना यातील गुन्हेगार छोटा पापा व अजय उर्फ आज्या हे मुंबईतील विक्रोळी परिसरात वास्तव्यास असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीसांचे पथक ४ दिवसांपासून विक्रोळी परिसरात आरोपींचा शोध घेत होते. अखेर आरोपी राहत असलेल्या घराचा निश्चित पत्ता मिळाल्यानंतर पोलीस पथकाने त्या ठिकाणी मध्यरात्री छापा टाकून कुख्यात गुन्हेगार नामे १) जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा, वय २२ वर्षे, व २) अजय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आज्या, वय २७ वर्षे, दोघे रा. गायकवाड नगर, इगतपुरी, ता. इगतपुरी, हल्ली हरीयाली व्हिलेज, गणेश चाळ, विक्रोळी पुर्व, मुंबई या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. दोन्ही गुन्हेगारांना इगतपुरी पोलीस ठाण्यातील भादवि कलम ३०२, ३४ या दोन गुन्हयांमध्ये अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची ३ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. ह्या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नाशिक ग्रामीण विभाग अर्जुन भोसले, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे हे करीत आहेत.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलीस अधीक्षक माधुरी केदार- कांगणे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, विशेष पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विकास ढोकरे, पोहवा दिपक आहीरे, किशोर खराटे, गोरक्षनाथ संवस्तरकर, पोकॉ गिरीष बागुल, विनोद टिळे, पोना हेमंत गिलबिले, प्रदिप बहीरम, इगतपुरीचे पोहवा सचिन देसले, मुकेश महीरे, पोकॉ अभिजित पोटींदे यांच्या पथकाने अत्यंत चिकाटीने मेहनत घेवून ह्या कुख्यात गुन्हेगारांना अटक केली आहे. इगतपुरी शहरातील डेव्हीड गँगच्या वरील दोन कुख्यात सदस्यांना नाशिक ग्रामीण पोलीसांनी अटक केल्याने इगतपुरी शहर, कसारा, कल्याण या ठिकाणांवरील, रेल्वेस्टेशन परिसरातील गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे. पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट व धाडसी कामगिरीची दखल घेवून पोलीस अधीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी तपास पथकास २० हजाराचे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे.

आरोपी क्र. १) जॉन पॅट्रीक मॅनवेल उर्फ छोटा पापा, वय २२, रा. गायकवाड नगर, इगतपुरी याचे विरुध्द दाखल गुन्हे.
१) इगतपुरी रेल्वे पो.स्टे. गुरनं ०६/२०२१ भादवि कलम ३०७, ३४ सह आर्म ॲक्ट ४ / २५
२) कल्याण रेल्वे पो.स्टे. गुरनं १४४ / २०२२ भादवि कलम ३९८,३९२,३४
३) इगतपुरी पो.स्टे. गुरनं १०४ / २०२२ भादवि कलम ३०२,३४
४) इगतपुरी पो.स्टे. गुरनं ३०९ / २०२२ भादवि कलम ३२३,५०४,५०६
५) इगतपुरी पो.स्टे. गुरनं ३१० / २०२२ भादवि कलम ५०४, ५०६
६) इगतपुरी रेल्वे पो.स्टे. गुरनं ०६/२०१९ भादवि कलम ३०७, ३४
आरोपी क्र. २) अजय पॅट्रीक मॅनवेल उर्फ आज्या, वय २७, रा. गायकवाड नगर, इगतपुरी याचे विरुध्द दाखल गुन्हे
१) इगतपुरी रेल्वे पो.स्टे. गुरनं ६१ / २०१४ भादवि कलम ३५२,३३२, ३३३,३४
२) इगतपुरी पो.स्टे. गुरनं १०१ / २०२० भादवि कलम ३०२, १२०-ब, ३४ सह मोक्का कायदा
३) इगतपुरी पो.स्टे. गुरनं २१ / २०२० भादवि कलम ३०७,५०४,३४
४) इगतपुरी पो.स्टे. गुरनं ३३ / २०१७ भादवि कलम ३०७, ३२३,३३३, ३४
५) इगतपुरी पो.स्टे. गुरनं ७० / २०१२ भादवि कलम ३०२, ३०७,१४३, १४७, १४८, १४९

Similar Posts

error: Content is protected !!