
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला आणि इगतपुरी येथे औद्योगिक वसाहत असून तालुक्यातील अनेकांना यातील कारखान्यात रोजगार मिळतो. यासह नव्याने येणार असलेल्या उद्योग समूहासाठी नाशिकसह अन्य ठिकाणी जागा मिळत नाही. यावर पर्याय म्हणून इगतपुरी तालुक्यातील आडवण, पारदेवी, बलायदुरी भागातील जमीनी औद्योगिक वसाहतीसाठी संपादित होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे या भागाला मोठे महत्व प्राप्त होणार असून जमिनीच्या किमती वाढणार आहेत. भांडवलदार गुंतवणूकदारांनी यापूर्वी ह्या भागातील जमिनीमध्ये गुंतवणूक केली असल्यामुळे सामान्य शेतकऱ्याला किती फायदा होईल याबाबत सांगता येणार नाही. मुंबई आग्रा महामार्ग हा देशभरातील महत्वाच्या शहरांना जोडला जातो. यातच समृद्धी महामार्गामुळे संपर्क वाढला आहे. मुकणे, पाडळी देशमुख, मुंढेगाव या भागाचाही औद्योगिक वसाहतीसाठी विचार होऊ शकतो अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा आहे. एमआयडीसी विभागाकडून यावर सर्वांगीण पर्यायी विचार सुरु असून इगतपुरी तालुक्यातील ३६७ हेक्टर जमीन संपादन होईल अशी परिस्थिती आहे. संबंधित यंत्रणेकडून यावर कार्यवाही सुरु असून नेमके चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.