![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210418-WA0030-1-970x1024.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/IMG-20210418-WA0030-1-970x1024.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ ( प्रभाकर आवारी, मुकणे )
इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख, मुकणे हात दोन गावांत कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. पाडळी देशमुख गावातील निम्म्याहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची चर्चा आहे. हा संसर्ग मुकणे येथेही असून अनेकजण पॉझिटिव्ह आहेत. अर्थातच आरोग्य विभाग अनेकविध उपाययोजना करीत असला तरी वाडीवऱ्हे प्राथमिक उपकेंद्रातील अनेक कर्मचारीही पॉझिटिव्ह आलेले आहेत. परिणामी या उपकेंद्राच्या अखत्यारित येणाऱ्या १४ गावांना सेवा देण्यासाठी अवघे ४ कर्मचारी जीवापाड काम करत आहेत. वाडीवऱ्हे आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढविल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्याला मदत होईल. म्हणून आरोग्य कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, मुकणेचे सरपंच हिरामण राव यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पंचायत समिती सदस्य अण्णा पवार उपस्थित होते. वाडीवऱ्हे केंद्रातील कमी कर्मचारी संख्येमुळे कोविड टेस्ट, लसीकरण करणेसाठी अडथळा येत आहे. महामार्गापासून जवळच असलेल्या पाडळी देशमुख देशमुख, मुकणेसह जवळील गावांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा मागणी करूनही वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवली जात नसल्याने अवघ्या ४ कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत येतो। याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यावर होत आहे. पाडळी देशमुख, मुकणे येथील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले असल्याने वाडीवऱ्हे आरोग्य केंद्रातील कर्मचारी संख्या वाढवावी. कोविड टेस्ट करण्याबरोबरच लसीकरण करून आरोग्य सुविधा देण्यासाठी तालुका आरोग्य विभागाने लक्ष घालण्याची मागणी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, मुकणेचे सरपंच हिरामण राव यांनी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.