गोरख बोडके ठरले तालुक्याचे “दातृत्ववीर” ; पदरमोड करून दिले १० “रेमडेसिवीर”

इगतपुरीनांमा न्यूज, दि. १९
कोरोनामुळे अभूतपूर्व अशी भयानक परिस्थिती सर्वत्र उदभवली आहे. ऑक्सिजनची टंचाई, बेडचा सवाल, तुटपुंजी आरोग्य यंत्रणा अशा अनेकविध अडचणींवर मात करून कोरोना युद्ध सुरू आहे. अशा आणीबाणीच्या क्षणी अनेकांच्या खऱ्या दातृत्वाची कसोटी पाहायला मिळते. बऱ्याच जणांनी त्यांची चांगली परिस्थिती असतांनाही मदत करण्याच्या लढाईत किंचितही योगदान दिले तर नाहीच पण ते सध्या कुठं आहेत ? असाही सवाल विचारला जातो. मात्र कायमच सकारात्मक राहून जनसेवेला वाहून घेतले माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी आज किमान १० अत्यवस्थ रुग्णांना वाचवायला उपयुक्त असणारे १० रेमडेसिवीर इंजेक्शन इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात स्वखर्चाने उपलब्ध करून दिले. यापूर्वी त्यांनी स्वयंचलित ऑक्सिजन यंत्र, स्वमालकीच्या कंपनीतील ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा जनसेवेला अर्पित केले. १० रेमडेसिवीर उपलब्ध करून दिल्यामुळे गोरख बोडके खऱ्या अर्थाने इगतपुरी तालुक्याचे “दातृत्ववीर” ठरले आहेत.
अत्यवस्थ कोरोना रुग्णांसाठी सध्याच्या परिस्थितीत रेमडेसिवीर हे इंजेक्शन उपयोगी ठरते आहे. ह्यासाठी राज्यभर प्रचंड मागणी आहे. मोठी वशिलेबाजी आणि जास्त पैसे देऊनही हे इंजेक्शन मिळायला अनेकविध अडचणी आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे ह्या इंजेक्शनच्या वितरणाची जबाबदारी असल्याने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या अत्यवस्थ रुग्णांसाठी १० रेमडेसिवीर आज मंजूर करण्यात आले. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयाचे औषध निर्माण अधिकारी इंजेक्शन पुरवणाऱ्या एजन्सीकडे इंजेक्शन आणायला गेले. मात्र संबंधित एजन्सीला १० इंजेक्शनची रक्कम लगेचच देणे आवश्यक होते. राज्य सरकारचे रुग्णालय असूनही पैसे दिल्याशिवाय इंजेक्शन मिळणे दुरापास्त होते. शासकीय रक्कम देण्यासाठी विविध सोपस्कार पार पाडावे लागत असल्याने ही समस्या निर्माण झाली.
इगतपुरीच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे यांच्याकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांना ही महत्वाची बाब समजली. त्यांनी काहीही विचार न करता संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्यांना नाशिकच्या एजन्सीमध्ये समक्ष भेटून १० इंजेक्शनची रक्कम स्वखर्चातून सुपूर्द केली. तात्काळ इंजेक्शन ताब्यात घेऊन अत्यवस्थ रुग्णांना वाचवा असे सांगितले. अशा निर्मळ हेतूने त्यांच्या दातृत्वामुळे १० जणांचे प्राण वाचणार आहेत. रेमडेसिवीर मिळवून दिल्याने गोरख बोडके इगतपुरी तालुक्याचे “दातृत्ववीर” ठरले आहेत. यापूर्वीही खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यांच्याकडे मदत मागितली. त्यानुसार त्यांनी अनेकांना इंजेक्शन उपलब्ध करून दिलेले आहेत. इगतपुरी तालुक्यात अजून अनेक लोक मदत करण्याची क्षमता धारण करतात. संबंधितांनी स्वतःहुन मदतीच्या प्रवाहात सहभागी झाल्यास तालुका कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

Similar Posts

Comments

  1. avatar
    Kanchan Ashok sahane says:

    आजच्या युगातील बापमाणूस सलाम तुमच्या कर्तुत्वाला

Leave a Reply

error: Content is protected !!