भवानी माता यात्रोत्सवानिमित्त चित्ताकर्षक शोभायात्रेने वेधले भाविकांचे लक्ष : गोंदे दुमाला ग्रामस्थांच्या एकजुटीचा लोकोत्सव कौतुकास्पद

इगतपुरीनामा न्यूज, दि ६ – इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला  ग्रामदेवता भवानी माता जंगी यात्रोत्सवानिमित्त आज सकाळपासून भवानी मातेच्या पूजेसाठी आणि दर्शनासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली. विविध वस्तूंच्या दुकानामध्ये खरेदी झाली. गोंदे दुमाला येथील सर्व ग्रामस्थ पारंपरिक फेटे बांधून प्रचंड उत्साहात सहभागी झाले. संपूर्ण गावातून भवानी मंदिरापर्यंत काढण्यात येणाऱ्या भव्य शोभायात्रेत ग्रामस्थांच्या एकोप्याचे दर्शन झाले. घरोघरी रांगोळ्या काढण्यात येऊन रथाचे पूजन महिला भाविकांनी केले. सजवलेले हत्ती, घोडे, उंट यांच्या सहभागाने आबालवृद्ध खुश झाले. ही मिरवणूक इगतपुरी तालुक्यात आकर्षणाचा विषय ठरली. तळेगाव येथील न्यू इंग्लिश स्कुलच्या लेझीम पथकाची कला, कळवणकरांचा बोहडा, दिंडोरीकर यांचे अश्व नृत्य, साल्हेर किल्ल्याचे पावरी नृत्य आदींचे कलात्मक आविष्कार शोभायात्रेत पाहायला मिळाले. उद्या ७ एप्रिलला विविध खेळांचे आयोजन असून पंचक्रोशीतील खेळ प्रेमींनी यात्रा कमिटीशी संपर्क साधावा असे आवाहन  ग्रामपंचायत गोंदे दुमाला, समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

Similar Posts

error: Content is protected !!