
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी येथील ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडेनिमित्त इगतपुरीत प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली. श्वेत वस्त्र परिधान केलेले ख्रिस्ती बांधव हातात क्रूस घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीत येशु ख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि क्रूसावर चढविण्यात आले तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरुपात कलाकारांनी सादर केला. ख्रिस्ती बांधवांनी वधस्तंभ खांद्यावरून वाहून नेत हा शोकदिवस पाळला. येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रुसावर आपले बलिदान दिले तो दिवस ‘गुड फ्रायडे’ म्हणून पाळला जातो. इगतपुरीत चार प्रमुख प्रार्थनास्थळे असून, तेथे यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम पार पडले. सॅक्रेड हार्ट चर्चमध्ये फादर झेवियर यांच्या प्रवचन झाले. यावेळी त्यांनी वधस्तंभावर येशूंनी उच्चारलेल्या ‘हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाही’, ‘मी तुला खचित खचित सांगतो, आज तू माझ्यासोबत सुखलोकात असशील’, ‘बाई, पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आई’, ‘माझ्या देवा! तू माझा त्याग का केला?’, ‘मला तहान लागली आहे’, ‘पूर्ण झाले आहे’, ‘हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो’ या सात वाक्यांवर प्रवचन दिले. याप्रसंगी चर्चचे धर्मगुरू फादर झेवियर, सर्व सिस्टर, आणि इतर सर्व ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.

