इगतपुरीनामा न्यूज, दि. २८ – इगतपुरी तालुक्यातील शेकडो स्थानिक बेरोजगारांना कंपन्याचे उंबरठे झिजवावे लागत आहे. महामार्ग, रेल्वे, लष्कर, धरणे, समृद्धी आणि अनेक शासकीय प्रकल्पासाठी तालुक्याच्या जमिनी संपादन केलेल्या आहेत. मात्र बाधित शेतकऱ्यांच्या कुटुंबातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून दिला जात नसल्याने ते हतबल झाले आहेत. ह्या सर्व स्थानिक तरुणांना विविध कंपन्यांमध्ये काम मिळावे यासाठी स्वराज्य संघटना पाठपुरावा करणार असल्याची माहिती स्वराज्य संघटनेच्या कामगार आघाडीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रविकांत धोंगडे यांनी दिली.
स्वराज्य ही संकल्पना शेतकरी, कष्टकरी, विस्थापितांसाठी, गोरगरिबांसाठी असून प्रस्थापितांसाठी नाही. जिथे अन्याय होणार तिथे लढा होणार आहे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून हक्काचा रोजगार देण्यासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. इगतपुरी तालुक्यात बेरोजगारांच्या समस्यां दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अनेक कंपन्यांमध्ये अनेकदा प्रयत्न करूनही काम द्यायला टाळाटाळ केली जाते. राष्ट्रीयकृत बँका रोजगारासाठी युवकांना कर्ज द्यायला नाखुष असतात. अनेक कारणे सांगून युवकांची बोळवण करतात. यामुळे इगतपुरी तालुक्यातील युवक अधिकच वैफल्यग्रस्त होत आहेत. यामुळे सर्व घटकांना एकत्र करून न्याय मिळवून देण्यासाठी कृतिशील राहणार असल्याचे रविकांत धोंगडे यांनी शेवटी सांगितले.