इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ – मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिकारांतर्गत आरटीई २५ टक्के राखीव आरक्षणानुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षासाठी इगतपुरी तालुक्यात प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. खासगी विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी ही प्रवेशप्रक्रिया असून पटसंख्येच्या २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील एकूण १६ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी एकूण १११ विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने सोडतीद्वारे निवड केली जाणार आहे. १७ मार्च २०२३ रात्री १२ वाजेपर्यंत पालकांना ऑनलाइन अर्ज भरता येतील. पालकांनी प्रवेशासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह https//students.maharashtra.gov.in किंवा www.rte25admission.maharshtra gov.in या संकेतस्थळावर योग्य माहितीसह अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पूर्ण करावी असे आवाहन इगतपुरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केले आहे.
इगतपुरी तालुक्यात १११ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी असीमा बाल शैक्षणिक केंद्र आवळखेड, श्री सरस्वती इंग्लिश मिडीयम स्कूल भरवीर बुद्रुक, नित्यानंद इंग्लिश मीडियम स्कूल घोटी, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल घोटी, आर्य चाणक्य इंग्लिश मीडियम स्कूल घोटी, राजलक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूल गोंदे दुमाला, प्रियदर्शिनी स्कूल कवडदरा, फिनिक्स मुंढेगाव, चाणक्य इंग्लिश मीडियम स्कूल साकूर, स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल साकुर, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे, स्पीडवेल इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे, एंजल इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे, सिद्धकला इंग्लिश मीडियम स्कूल वाडीवऱ्हे, अभिनय बालमंदिर इगतपुरी, पंचवटी इंग्लिश मीडियम स्कूल टाकेघोटी, लिटल ब्लॉसम इगतपुरी या शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे. प्रवेशाबाबत मार्गदर्शनासाठी प्रथम संबधित शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे संपर्क साधता येईल. प्रवेशासाठी पाल्याचा जन्मतारखेचा पुरावा, जातीचा किंवा तहसीलदारांनी दिलेला एक लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला, पालकाचा रहिवास पुरावा, अपंगत्व असेल तर त्याचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.