इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – वयाच्या आठव्या वर्षी ब्रेन ट्यूमर झाला. सलग तीन वेळा ब्रेन ट्यूमरची नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आताही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केले आहे. परंतु परीक्षेमध्ये 1 महिना पुढे शस्त्रक्रिया ढकलली आहे. शस्त्रक्रियेनंतर दृष्टी हळूहळू कमी होत गेली. वयाच्या दहाव्या वर्षी दीक्षा पूर्णतः अंध झाली. शिकण्याची प्रचंड आवड व ओढ असल्याने तीने शांत व खचून न जाता, कलेक्टर होण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. ती समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण, पंचायत समिती इगतपुरी अंतर्गत सामान्य शाळेत सामान्य मुलाबरोबर शिक्षण पूर्ण करत आहे. ब्रेल शिकण्यासाठी कमीत कमी सहा महिन्याचा कालावधी लागतो. परंतु दीक्षाने 21 दिवसात विशेष शिक्षक बाप्पा गतीर यांचे मार्गदर्शन आणि सरावाने ब्रेल अध्यापन पूर्ण केले. दीक्षा अतिशय चाणाक्ष हुशार व कुशाग्र बुद्धिमत्तेची असून सर्व विषयांमध्ये ती पारंगत आहे. अपंगत्वाचा बाऊ न करता कुठलीही अधिकची सुविधा न घेता दीक्षाने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
आजपासून दीक्षा इयत्ता दहावीची परीक्षा देत आहे. परीक्षेसाठी तिने निवडलेले सर्व विषय हे सर्व सामान्य मुलांचेच आहेत. फक्त तिला लिहिण्याची अडचण असल्याने कुमारी सिद्धी बाळू गतीर या लेखनिकाद्वारे दीक्षा आपले पेपर देणार आहे. दीक्षाला कलेक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असणाऱ्या दीक्षाने आज एसएससी बोर्ड परीक्षेत पदार्पण करत पाहिले पाऊल टाकत आहे. दीक्षाच्या उज्वल भविष्य आणि यशासाठी इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जनता विद्यालय घोटी शाळेचे प्राचार्य एस.ए. पाटील, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोटी मुले नं 1 जहीर अ. सत्तर देशमुख व विशेष शिक्षक बाप्पा गतीर यांनी विद्यार्थीचे आणि लेखानिक यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सर्व केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, विशेष शिक्षक विशेष तज्ञ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.