इगतपुरीनामा न्यूज, दि. २ – दहावीच्या परीक्षेला आज सर्वत्र सुरुवात झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील नऊ परीक्षा केंद्रांवर दहावीच्या पेपरला सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात सुरूवात झाली आहे. दरम्यान यंदा सर्वत्र कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने पोलीस आणि गृहरक्षक दल परीक्षा बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहे. इगतपुरी आणि घोटी शहरात प्रत्येकी दोन परीक्षा केंद्र असून तालुक्यात एकूण नऊ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. दहावी परीक्षेसाठी आवश्यक ते व्यवस्थापन करण्यात आले असून कॉपीमुक्त वातावरणात अस्वली येथील जनता विद्यालयात परीक्षेला सुरवात झाल्याची माहिती मुख्याध्यापिका सुनीता जगताप यांनी दिली.
कॉपीमुक्त अभियानाला अनुसरून यंदा पर्यवेक्षणातही बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायची आहे, त्या केंद्रातील पर्यवेक्षक यंदा त्याच केंद्रात काम न करता इतर परीक्षा केंद्रावर काम करणार आहेत. त्यामुळे सर्वच परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पूर्णतः नवीन चेहरे पर्यवेक्षक म्हणून दिसणार आहेत. परिक्षांमधील गैर प्रकारांना आळा बसावा यासाठी यंदा प्रायोगिक तत्त्वावर हा बदल करण्यात आला असून यावर्षी विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक म्हणून इतर शाळांमधले शिक्षक परीक्षा केंद्रावर काम करतांना दिसतील. गैरप्रकारांना मोठ्या प्रमाणावर आळा बसावा यासाठी केलेली ही उपाययोजना कितपत यशस्वी होते हे आगामी काही दिवसात जाहीर होणाऱ्या निकालातून समोर येणार आहे.