हरसूल येथे कोविड सेंटर सुरू करा ; महसूलमंत्र्यांकडे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 18
कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या वातावरणामुळे आदिवासी बांधवांची हेळसांड वाढत आहे. खासगी आरोग्य सेवा घेण्यासाठी लागणारे लाखो रुपये आदिवासी बांधवांकडे नाही. त्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे १०० बेडचे कोविड सेंटर तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. सेंटरमध्ये डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, मदतनीस यासह ऑक्सिजनचा पुरेसा साठा द्यावा. औषधांची मुबलक व्यवस्था करावी अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केली आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना संगमनेर येथे समक्ष भेटून त्यांनी हरसुलच्या कोविड सेंटरबाबत सखोल चर्चा केली. यावेळी मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परीसरातील आदिवासी गावांचा विस्तार महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वसलेला आहे. त्र्यंबकेश्वर येथील कोविड सेंटर हरसूल परिसरातील गावांना अडचणीचे असून सोयीस्कर नाही. ह्या भागातील आदिवासी नागरिकांना त्र्यंबकेश्वर आणि नाशिक सारख्याच अंतरावर असून अत्यंत गैरसोयीचे आहे. हरसूल भागातील कोरोना रुग्णांची यामुळे ससेहोलपट होते. यासह दळणवळणाच्या सुविधा नसल्याने आदिवासी नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यास प्रचंड त्रास सोसावा लागतो. एवढे करूनही नाशिक त्र्यंबकेश्वर येथे बेड सुद्धा मिळत नाही. परिणामी अत्यवस्थ रुग्णांना अर्ध्या रस्त्यातच जीव गमवावा लागतो. त्यामुळे हरसूल येथे तातडीने कोविड सेंटर उभारावे असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हरसुलला कोविड सेंटर देण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले.