![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/navbharat-times-1024x766.jpg)
![](https://igatpurinama.in/wp-content/uploads/2021/04/navbharat-times-1024x766.jpg)
इगतपुरीनामा न्यूज, दि. 18
सलून व्यवसायिकांचे हातावर पोट असल्याने त्यांना सध्या उपजीविकेसाठी कोणतेही साधन नाही. कोरोनाच्या महामारीत आपल्या कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या ? असा गंभीर प्रश्न सलून व्यावसायिकांना पडलेला आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी बुद्रुक येथील बाजारपेठेत नाभिक सलून व्यावसायिकांची सुमारे ६० ते ६५ इतकी दुकाने आहेत. केवळ सलून व्यवसायातूनच कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविणे शक्य होत असल्याने सलून व्यावसायिकांना उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही. गेल्या वर्षभराच्या काळात सलून व्यवसाय हा अत्यंत डबघाईत चाललेला होता. मात्र आता कुठेतरी त्यांनी आपली मरगळ झटकून त्यांचा व्यवसाय पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती. त्यातच घोटी येथील मुख्य बाजारपेठेतील सर्व सलून दुकानें बंद करण्याच्या शासन आदेशाने पुन्हा सलून व्यावसायिक आर्थिक कात्रीत सापडलेला आहे. नाभिक बांधवांना शासनाकडून दिलासा मिळणार का की नाही असा सवाल सलून असोसिएशनचे तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र कोरडे यांनी केला आहे.
जागेचे अवास्तव वाढलेले डिपॉझिट, लॉकडाऊनमध्ये धंदे नसताना द्यावा लागणारे दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, कारागिरांना अर्धवट सोडता येणार नसल्याने त्यांचा खर्च व त्यामध्ये कौटुंबिक खर्च कसा भागवायचा असा प्रश्न गंभीर प्रश्न सलून व्यवसायिकांना पडला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण २७ सलून व्यावसायिकांनी गरिबी व आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्या आहेत. मात्र अशीच परिस्तिती राहिली तर इतर सलून व्यवसायिकावर देखील आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते. शासनाने वेगवेगळ्या स्तरातील आर्थिक मागासलेल्या नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला असुन नाभिक सलून व्यावसायिकांच्या पदरी मात्र निराशाच पडलेली आहे. सलून केश कर्तनालाय बंद करतांना नाभिक समाजाला किमान आर्थिक पॅकेज तरी द्यावयास हवे होते.
लॉकडाऊनमध्ये लादलेल्या जाचक अटीचा सहानुभूतीपूर्वक फेरविचार करून नाभिक समाजा विषयी सकारात्मक विचार करावा. नाभिक समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मांगणी नाशिक जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, तालुकाध्यक्ष मच्छिन्द्र कोरडे, अँड. सुनिल कोरडे, निवृत्ती आंबेकर, अशोकराव सूर्यवंशी, गणेश नंदू रायकर, विशाल कदम, किरण कडवे, कैलास जाधव, भुषण डाके, योगेश कोरडे, प्रदीप कडवे, अनिल सूर्यवंशी, अमोल हिरामण कडवे, वैभव कोरडे, संजय सोनवणे, नवनाथ सोनवणे, नितीन सोनवणे, प्रवीण काशीकर, ज्ञानेश्वर रायकर, आदेश जाधव, संकेत कोरडे, लक्ष्मण सोनवणे, अनिल कोरडे, राजाराम बिडवे, खंडेराव रायकर, मच्छिन्द्र बिडवे, रवी सूर्यवंशी,प्रमोद कोरडे, मयूर भराडे, सुमित अनारे आदी समाज बांधवांनी केली आहे.