इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – समग्र शिक्षा, आमदार हिरामण खोसकर यांचा निधी, ग्रामस्थ आणि एम्पथी फाउंडेशनच्या सहाय्याने इगतपुरी तालुक्यातील गिरणारे जिल्हा परिषद शाळेची नवी इमारत साकारली आहे. एम्पथी फाउंडेशनचे विश्वस्त राजेन छेडा, किन्नरी छेडा यांच्या हस्ते ह्या नव्या इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हिरामण खोसकर यांचे चिरंजीव वामन खोसकर, एम्पथी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरेश्वरन, इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, शालेय पोषण आहार अधिक्षिका प्रतिभा बर्डे, विस्ताराधिकारी अशोक मुंढे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इगतपुरीचे माजी नगराध्यक्ष संजय इंदुलकर होते. तत्कालीन उप अभियंता प्रवीण शिरसाठ, शाळा व्यवस्थापन समितीचे संजय पाटील, आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, शिक्षक, ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते. शिक्षणाच्या पवित्र कार्यासाठी एकजुटीने काम करणाऱ्या गिरणारे ग्रामस्थांचे मान्यवरांनी कौतुक केले.
शिवशौर्य ढोल पथकाच्या गजरात सजवलेली बैलगाडी आणि रथामधून मान्यवरांची मिरवणूक काढून विद्यार्थिनींनी औक्षण केले. शाळेच्या नव्या इमारतीसाठी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी १० लाखांचा निधी, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मदतीने समग्र शिक्षा निधीतून ८ लाख आणि उर्वरित ५० लाख रुपये एम्पथी फाउंडेशनने उभे करून अतिशय सुंदर व टुमदार इमारत उभी केली. याप्रसंगी गिरणारे गावकऱ्यांनी सणोत्सवाप्रमाणे रांगोळ्या, घराला तोरणे लावून आनंदोत्सव साजरा केला. मनीषा वाळवेकर यांनी काढलेली स्वांतीलाल खेडा यांची अप्रतिम रांगोळी आणि सुनील शिंदे यांचे रेखाकलन आकर्षक ठरले. विद्यार्थ्यांच्या विविध गुण दर्शनासाठी एम्पथी फाउंडेशनने ५१ हजाराचे बक्षीस दिले. शालेय भौतिक सुविधा मैदान बनवणे, रंगकाम यासाठी गावकऱ्यांनी ६ लाखांचा निधी उभारला. सर्व शिक्षक संघटना, शिक्षक, पंचक्रोशीतील पदाधिकारी, अधिकारी, तरुण मित्र मंडळ, ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सर्व गावकऱ्यांकडून सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त करून आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. इमारतीच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या ग्रामस्थांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.