इगतपुरीनामा न्यूज, दि. १३ – घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेअंतर्गत धडक कारवाई सुरु केली आहे. इगतपुरी तालुक्यातील खैरगांव व बोरीचीवाडी भागात आज सोमवारी सकाळपासून गावठी हातभट्ट्या तोडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खैरगाव व बोरीचीवाडी येथे गावठी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर घोटी पोलिसांनी छापा टाकला. यात गावठी दारू बनविण्यासाठी सडवलेले रसायन आणि दीड लाख किमतीची दारू पोलिसांनी यावेळी नष्ट केली. यापुढेही अवैध धंदे नेस्तनाबूत करण्यासाठी पोलीस कारवाई करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सांगितले.
घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावठी दारूच्या हातभट्ट्या व गावठी दारू तयार करणाऱ्या भागात पोलिसांनी सूक्ष्म नियोजन करून डाव उधळून लावत धडाकेबाज कारवाई सुरू आहे. बेकायदेशीरपणे गावठी दारू निर्मात्यांना यामुळे चांगलाच चाप मिळाला आहे. अवैध दारू विकणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नसल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसआय राऊत, पोलीस हवालदार अमोल केदारे, बस्ते, संदीप दूनबळे, योगेश यंदे, प्रसाद दराडे, शिवाजी शिंदे, संदीप मथुरे, निलेश साळवे, चालक दत्ता गायकवाड या पोलीस पथकाने ही कामगिरी केली. संबंधित संशयित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.