तुकाराम रोकडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ४
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामूंडी येथील विद्युत रोहित्र गेल्या १५ दिवसांपासून नादुरुस्त झाले आहे. यामुळे गावातील नागरिकांसह विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे. बँकेच्या व्यवहारात खंड पडला असून नागरिकांचे ऐन शेती कामाच्या हंगामात आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. यासंदर्भात महावितरण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सामूंडी महसूली गाव असून आर्थिक उलाढालीकरिता गावात एक बँक आहे. या बँकेत तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील सुमारे ७० ते ८० गावे आणि वाडी-वस्त्यांचा व्यवहार आहे. मात्र तब्बल पंधरा दिवसांपासून विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने विजेअभावी बँकेचे कामकाज बंद आहे. आर्थिक व्यवहार देखील ठप्प झाल्याने ग्रामीण आदिवासी, दुर्गम भागातील गोरगरिबांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच १५ जूनपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिकवणीचे वर्ग सुरू झाले आहे. मात्र विजेअभावी मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत झाला आहे. शिक्षकांनी दिलेल्या दररोजच्या अभ्यासाला मुकावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे.
महावितरण विभागाने सामूंडी गावकरिता २५ अश्वशक्तीचे रोहित्र बसविले होते. मात्र, रोहित्र नादुरुस्त होऊन नागरिकांना तब्बल पंधरा दिवसांपासून अंधाराचा सामना करावा लागत असून ऐन पावसाळ्याच्या दिवसांत विजेअभावी दिवस काढावे लागत आहे. तर विजेच्या कमतरतेमुळे विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर होत नसल्याने त्या वस्तू शोभेच्या वस्तू ठरत आहेत.
महावितरण विभागाकडे नागरिकांनी यासंदर्भात तक्रार केली होती. त्याबदल्यात वीज मंडळाने गावकऱ्यांना आठ दिवसांत रोहित्र बसविले जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आठ दिवस उलटूनही रोहित्र न बसविल्याने महावितरणचे खोटे आश्वासन व विद्युत रोहित्र शिल्लक नसल्याचे कारण देऊन टाळाटाळ केली जात असल्याचा देखील आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून विजेअभावी बँकेचे कामकाज बंद आहे. ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला व घरकुल लाभार्थी आदींनी विजेअभावी बँकेचा व्यवहार ठप्प असल्याचा फटका बसत आहे. मात्र, नागरिकांची निकड लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर शाखेकडे व्यवस्था केली आहे. परंतु, त्यातही त्यांना दळणवळणाकरिता आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
– शरद अमोडे, शाखा व्यवस्थापक, कॅनरा बँक, सामूंडी
सामूंडी येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार आमच्याकडे आली असून त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. मात्र, सामूंडी गावकरिता आवश्यक असलेला २५ अश्वशक्तीचा रोहित्र उपलब्ध नसल्याने विलंब होत आहे.
– किशोर सरनाईक, उपअभियंता महावितरण, त्र्यंबकेश्वर
विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याची तक्रार महावितरण विभागाकडे दोन वेळा केली आहे. मात्र, विजमंडळाने नादुरुस्त झालेले रोहित्र बदलून खंडित झालेला वीज पुरवठा अद्याप सुरळीत केलेला नाही. महावितरण विभागाने दिलेल्या आठ दिवसांच्या आश्वासनाचा कालावधी उलटूनही कार्यवाही झालेली नाही.
– अशोक गवारी, सरपंच, सामूंडी
ग्रामीण भागातही ऑनलाईन शिकवणीचे वर्ग सुरू झाले असून विद्यार्थ्यांना विजेअभावी मोबाईल चार्ज होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा दररोजचा अभ्यास बुडत आहे. महावितरण विभागाने विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन विलंब न करता विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा.
– दीपक व्याळीज, मुख्याध्यापक, आदर्श विद्यालय, सामूंडी